अशा प्रकारे करु शकता तिरुमला तिरुपती देवस्थानाच्या दर्शनाचे बुकिंग


कोरोनाचा कमी होत असलेला प्रादुर्भाव आणि लसीकरण मोहिमेमुळे सरकारने अनेक महिन्यांपासून बंद असलेली प्रार्थनास्थळे, मंदिरे उघडी केली आहेत. अशातच लाखो भाविक दरवर्षी तिरुमला मंदिराला आवश्य भेट देतात. देशातील अनेक ठिकाणाहून मंदिराला भेट देण्यासाठी भाविक येतात आणि यासाठी आधीच बुकिंगही करावे लागते. आंध्र प्रदेशातील तिरुमला व्यंकटेश्वर मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या तिरुमला तिरुपती देवस्थानम (टीटीडी) स्वतंत्र ट्रस्टने म्हटले आहे की, ती आज, २२ ऑक्टोबरपासून विशेष दर्शनासाठी तिकिटांची विक्री सुरू केली जाईल.

टीटीडीच्या अधिकृत संकेतस्थळावर पोस्ट केलेल्या नोटिसमध्ये म्हटले आहे की, सकाळी ९ वाजल्यापासून ‘विशेष प्रवेश दर्शना’ची तिकिटे बुकिंगसाठी उपलब्ध असतील. तिकिटांची किंमत प्रत्येकी ३०० रुपये आहे. यासाठी तुम्हाला तिरुमला तिरुपती देवस्थानमच्या अधिकृत वेबसाइटला येथे भेट द्यावी लागेल. त्यानंतर टीटीडीची नोटिस पेजवर लोड होईल. तेथील बुकिंगच्या लिंकवर क्लिक करा: कृपया विशेष प्रवेश दर्शन (रु. ३००) तिकिटे बुक करण्यासाठी येथे क्लिक करा. ही लिंक तुम्हाला त्या पानावर फॉरवर्ड करेल जिथे तुम्ही तपशील भरू शकता आणि प्रक्रिया पूर्ण करू शकता.

तसेच कोविड -१९ खबरदारीचा एक भाग म्हणून, टीटीडीने यात्रेकरूंना दर्शनाचा लाभ घेताना खालील गोष्टी तयार करण्याची विनंती केली आहे. ज्यात दोन्ही डोसचे लसीकरण प्रमाणपत्र किंवा दर्शनाच्या तारखेपूर्वी ७२ तासांच्या आत कोविड -१९ चाचणीचे नकारात्मक प्रमाणपत्र असावे, अशा गोष्टींचा समावेश आहे.