असा बनला होता एअर इंडियाचा शुभंकर महाराजा


एअर इंडिया पुन्हा एकदा देशभर चर्चेत आली असून थोड्याच दिवसात या विमान कंपनीचे पूर्ण नियंत्रण टाटा समूहाकडे येणार आहे. देश विदेशात अतिशय लोकप्रिय ब्रांड ठरलेला एअर इंडियाचा शुभंकर महाराजा कसा जन्माला आला त्याची कथा मोठी रोचक आहे. या महाराजाची भरदार मिशी, त्याच्या चेहऱ्यावरचे मोहक हास्य विशेष चर्चेचा विषय ठरले होते. या महाराजाची प्रेरणा एका बड्या पाकिस्तानी उद्योगपतीवरून मिळाली होती याची माहिती फार थोड्यांना असेल. हा उद्योजक जेआरडी टाटा आणि त्यांचे कमर्शियल डायरेक्टर बॉबी कुका यांचा चांगला मित्र होता. १९३२ मध्ये जेआरडीनी विमान सेवा सुरु केली तेव्हा त्यातून फक्त पार्सल पाठविली जात होती त्यानंतर प्रवासी सेवा सुरु झाली. दुसऱ्या महायुद्धानंतर टाटांनी या विमान सेवेचे नाव एअर इंडिया असे केले आणि शेअर बाजारात कंपनी लिस्ट केली होती.

या विमान कंपनीसाठी शुभंकर म्हणजे मस्कॉट हवा म्हणून त्याची जबाबदारी बॉबी यांच्यावर दिली गेली. जाहिरात संस्थेचे आर्टिस्ट उमेश राव यांना बॉबी यांनी आपला शुभंकर रॉयल आणि फ्रेंडली हवा असे सांगितले. योगायोगाने त्याचा वेळी पाकिस्तानी उद्योगपती आणि टाटा व बॉबी यांचे मित्र सैय्यद वाजीब अलीसाहब मुंबईत आले होते. त्यांच्या मिशा अतिशय भरदार आणि प्रभाव टाकणाऱ्या होत्या. त्या मिशा त्यांच्या व्यक्तिमत्वाला उठाव देत असत. त्यावरूनच एअर इंडियाचा महाराजा आकाराला आला. या अलीसाहेबांप्रमाणे भरदार मिशांचा, तुरेदार पगडी घालणारा, हसतमुख, प्रवाशांचे अदबीने स्वागत करणारा आणि रॉयल दिसणारा महाराजा अस्तित्वात आला.

१९४६ मध्ये मुंबईच्या एअर इंडिया कार्यालयावर या महाराजाचा कटआउट लागला आणि परदेशात सुद्धा या महाराजाने सर्वाधिक प्रसिद्धी मिळविली. त्यानंतर जेव्हा जेव्हा नव्या देशासाठी आंतरराष्ट्रीय उड्डाणे कंपनीने सुरु केली तेव्हा खास प्रतिक स्वरुपात हा महाराजा दिसला. शेकडोच्या संखेने त्याची पोस्टर्स बनली. आज हे पोस्टर कलेक्शन, महागड्या पोस्टर कलेक्शन मध्ये गणले जाते.