लालबागमधील आलिशान इमारतीला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश


मुंबई – आज दुपारी १२ च्या सुमारास मुंबईतील लालबाग परिसरामधील एका आलिशान इमारतीला आग लागली. या आगीमधून बाहेर पडण्यासाठी, आपला जीव वाचवण्यासाठी एका व्यक्तीने १९ व्या मजल्यावरुन उडी मारली, त्यात त्याचा मृत्यू झाला. या सगळ्या घटनाक्रमादरम्यान, महापौर किशोरी पेडणेकर आणि महापालिका आयुक्त इकबाल चहल हे देखील घटनास्थळी दाखल झाले. चहल यांनी परिस्थितीची पाहणी केल्यानंतर ही आग नियंत्रणात आल्याची माहिती दिली आहे. त्याचबरोबर त्यांनी एक चिंताही व्यक्त केली आहे.

चहल घटनास्थळावरुन माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले, येथे जी दुर्दैवी घटना घडली आहे, तिला दोन भागात बघितले पाहिजे. सर्वात आधी म्हणजे ही आग लवकरात लवकर विझवायला हवी. आम्हाला ११ वाजून ५१ मिनिटांनी माहिती मिळाली आणि लगेचच तिथे लोक पोहोचले. ही आग आता विझवली गेली आहे. आमचे अधिकारी त्या इमारतीतच आहेत. आणखी काही घटना घडू नये यासाठी ही आग कायमची विझवली गेली पाहिजे. कारण अजूनही धूर येत आहे. आग विझली नाही, तर ही आग पुन्हा लागण्याची शक्यता आहे. कारण तशा काही गोष्टी इमारतीमध्ये आहेत. येथे एका व्यक्तीचा मृत्यूही झाल्याची माहिती माझ्यापर्यंत आली आहे. या सगळ्या दुर्घटनेमध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.