दुर्गा पूजा उत्सवावेळी ऊसळलेल्या गर्दीमुळे पश्चिम बंगालमधील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ


कोलकाता : देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घसरण होत असतानाच पश्चिम बंगालमधून संपूर्ण देशाची चिंता वाढवणारी कोरोनाबाधितांची आकडेवारी समोर आली आहे. काल दिवसभरात पश्चिम बंगालमध्ये 833 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 14 बाधितांनी आपला जीव गमावला आहे. पश्चिम बंगालमधील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 15 लाख 83 हजार 646 एवढी झाली आहे. तर मृतांची संख्या 19 हजार 21 एवढी झाली आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत दुर्गा पूजा उत्सवावेळी ऊसळलेल्या गर्दीमुळे वाढ होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

दुर्गा पूजेदरम्यान गर्दीत अनेक लोकांच्या तोंडावर मास्क नव्हते. कोरोना नियमांचा फज्जा उडाला होता. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. पश्चिम बंगालचा पॉझिटिव्हिटी रेटही वाढला आहे. सध्या पश्चिम बंगालचा पॉझिटिव्हिटी रेट 2.52 एवढा झाला आहे. पश्चिम बंगालमध्ये काल दिवसभरात 775 बाधितांनी कोरोनावर मात केल्यामुळे राज्यातील उपचाराधीन बाधितांची संख्या 753 एवढी झाली आहे. आतापर्यंत पश्चिम बंगालमधील 15.57 लाख जणांनी कोरोनावर मात केली आहे.

देशात सध्याच्या घडीला कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम वेगाने सुरु आहे. पण, दुसऱ्या डोसनंतरही पश्चिम बंगालमध्ये कोरोना झाल्याचे पाहायला मिळत असल्यामुळे पश्चिम बंगालमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पश्चिम बंगालमध्ये 163 जणांना कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतरही बुधवारी कोरोनाची लागण झाली. लसीकरण झाल्यानंतरही मास्क न वापरल्यामुळे कोरोनाची लागण झाल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.