पुणे : आज पुणेकरांना दिवाळीआधी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मोठे गिफ्ट दिले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीला पुणेकरांसाठी महत्वाची घोषणा केली. पुण्यात दिवाळी पहाट कार्यक्रमांचे आयोजन करण्यास परवानगी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर 100 टक्के क्षमतेने दिवाळीनंतर थिएटर्स सुरु करण्याचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच पुण्यातील ग्रामीण भागातील आठवडे बाजार देखील सुरु करण्यास परवानगी देण्यात आल्याचे त्यांनी सांगितलं.
पुण्यात दिवाळी पहाट कार्यक्रमांचे आयोजन करण्यास पालकमंत्र्यांची परवानगी
दरम्यान भविष्यात मेट्रोचे काम झाल्यानंतर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपूल पाडला. यासाठी अनेक तंत्रांचा वापर करण्यात आला. हे खरे आहे की नवीन काम करण्याची जबाबदारी असलेल्या टाटा कंपनीला काही अडचणी येत आहेत. पण हे काम दिवाळीनंतर सुरु करण्यात येईल, असे ते म्हणाले. पुण्यातील जंबो कोविड सेंटर कायम ठेवायचे की काढून टाकायचे याचा निर्णय दिवाळीनंतर घेऊ, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.