टी-20 विश्वचषक स्पर्धेत एकदाही विराटला आऊट करु शकला नाही पाकिस्तान


मुंबई : टी-20 विश्वचषक स्पर्धेमधील टीम इंडियाच्या मोहिमेची सुरुवात 24 ऑक्टोबरपासून होणार आहे. टीम इंडिया पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध भिडणार आहे. खेळाडूंसह क्रिकेट चाहतेही या सामन्यासाठी उत्सूक आहेत. विराट कोहली या संपूर्ण स्पर्धेत टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे. दरम्यान विराटचे पाकिस्तान विरुद्ध धमाकेदार रेकॉर्ड्स आहेत. विराटने नेहमीच टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या गोलंदाजांना विराटला कधीही टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये आऊट करणे जमलेले नाही.

टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये 2012 साली विराट पहिल्यांदा पाकिस्तान विरुद्ध खेळला होता. हा सामना कोलंबोत पार पडला होता. पाकिस्तानने सर्वबाद 128 धावा केल्या होत्या. तर विराटने टीम इंडियाकडून 61 चेंडूत 78 धावांची नाबाद खेळी केली होती. विराटच्या या खेळीमुळे टीम इंडियाने हा सामना 17 व्या ओव्हरमध्ये जिंकला होता.

पाकिस्तान विरुद्ध विराट 2014 साली टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये दुसऱ्यांदा खेळला होता. हा सामना ढाक्यात खेळवण्यात आला होता. पाकिस्तानने या सामन्यात 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 130 धावा केल्या होत्या. तर विराटने या सामन्यात 32 चेंडूत नाबाद 36 धावा करुन टीम इंडियाचा विजय सोपा करुन दिला होता.

पाकिस्तान विरुद्ध अखेरच्या वेळेस 2016 मध्ये विराट कोहली खेळला होता. हा सामना कोलकात्यात पार पडला होता. हा सामना 18 ओव्हर्सचा होता. 5 विकेट्स गमावून पाकिस्तानने 118 धावा केल्या होत्या. या सामन्यात विराटने 37 चेंडूत नाबाद 55 धावांची अर्धशतकी खेळी साकारली होती. या खेळीच्या जोरावर टीम इंडियाचा 13 चेंडूआधी विजय झाला होता.

या वरील आकडेवारीवरुन पाकिस्तान विरुद्धची विराटची आकडेवारी लक्षात आलीच असेल. त्यामुळे टीम इंडियाच्या चाहत्यांना या सामन्यातही विराटकडून अशाच प्रकारच्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. त्यामुळे विराट पाकिस्तान विरुद्ध नाबाद राहण्याची परंपरा कायम राखणार की पाकिस्तानचे गोलंदाज त्याला बाद करणार, हे 24 तारखेलाच स्पष्ट होईल.