‘सेक्स अॅक्ट’ व्हिडीओ लीक झाल्यामुळे ‘या’ देशातील पंतप्रधानांवर राजीनामा देण्याची नामुष्की


कोणत्याही देशासाठी पंतप्रधान पद हे खूप जबाबदारीचे पद असते. अशावेळी या पदावर विराजमान व्यक्तीकडून होणाऱ्या चुका थेट त्या देशाच्या प्रतिष्ठेला धक्का देणाऱ्या ठरतात, त्यामुळे या पदावर विराजमान व्यक्तीला खूप काळजी घ्यावी लागते. ही काळजी घेतली गेली नाही, तर क्षणात होत्याचे नव्हते होते आणि त्या पदावरून दूर होण्याची वेळ येते. असेच एक उदाहरण उत्तर सायप्रसमध्ये पहायला मिळाले आहे. उत्तर सायप्रसचे पंतप्रधान इर्सन सॅनर यांचा एक कथिक ‘सेक्स अॅक्ट’ व्हिडीओ लीक झाल्यानंमुळे त्यांना थेट पंतप्रधानपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.

या कथित सेक्स अॅक्ट व्हिडीओनंतर इर्सन सॅनर यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला असला, तरी त्या व्हिडीओत आपण नसल्याचा दावा सॅनर यांनी केला आहे. तसेच त्यांना बदनाम करण्यासाठीचा हा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे. ५४ वर्षीय इर्सन सॅनर दोन मुलांचे वडील आहेत. मागील अनेक दिवसांपासून त्यांच्यावर राजकीय दबाव तयार झाला आहे. त्यांचा स्वतःचा पक्ष राष्ट्रीय एकता पक्षाने देखील सरकारला दिलेला पाठिंबा काढून घेतला आहे. त्यानंतरही सॅनर पदावर कायम होते. पण, आता बहुमत आणि सरकार स्थिर नसल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आहे. या देशात लवकरच निवडणुका होऊन राजकारणात परतण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

इर्सन सॅनर यांच्या प्रतिमेला मंगळवारी (१९ ऑक्टोबर) समोर आलेल्या व्हिडीओमुळे मोठा झटका बसला आहे. या व्हिडीओत सॅनर यांच्यासमोर एक २० वर्षीय मुलगी गाण्याच्या लयावर आपल्या शरीरावरील कपडे काढून नग्नावस्थेत येताना दिसत आहे. पंतप्रधान इर्सन सॅनर यावेळी कथितपणे हस्तमैथून करताना दिसत आहेत. पण, सॅनर यांनी हा व्हिडीओ खोटा असल्याचा दावा केला आहे.

सॅनर या व्हिडीओवर आपली बाजू मांडताना म्हणाले, माझा हा व्हिडीओ नाही. कुणीतरी माझ्या प्रिय देशाची आणि पक्षाची सेवा करण्यापासून रोखत आहे. पण, ते असे राजकीय मार्गाने नाही, तर सार्वजनिक हल्ल्यांच्या माध्यमातून करत आहेत. त्यासाठी तयार करण्यात आलेल्या एका षडयंत्राचा भाग म्हणून हा व्हिडीओ प्रसारित केला जात आहे. तुर्कीच्या गुंडांवर आरोप करताना सॅनर म्हणाले की, केवळ माझ्यावर नाही तर माझे कुटुंब, पक्ष आणि एकूणच राजकीय संस्थांवरील हा हल्ला असल्यामुळे मी माझ्या राजकीय सल्लागारांसोबत चर्चा करत आहे.