चीनमध्ये परतला कोरोना, शेकडो उड्डाणे रद्द


उत्तर चीनच्या अनेक शहरात व प्रांतात अचानक शेकडो विमान उड्डाणे रद्द केली गेली असून शाळा बंद केल्या गेल्या आहेत. गुरुवारी पर्यटकांच्या एका गटातून कोविड १९ चा प्रसार होत असावा अश्या शक्यतेने सरकारने हे नवे आदेश लागू केल्याचे समजते. स्थानिक प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर चाचण्या करण्याचे आदेश जारी केले असून राजधानी बीजिंगच्या झिरो कोविड धोरणानुसार सीमा बंद केल्या गेल्या आहेत. काही भागात कडक लॉकडाऊन लावला गेल्याचेही समजते.

वास्तविक चीनने स्थानिक पातळीवर करोना संक्रमण पसरल्याची माहिती कधीच उघड केलेली नाही मात्र देशाच्या उत्तर आणि उत्तर पश्चिम क्षेत्रात करोना संक्रमितांचा आकडा वाढत चालला आहे. नव्या संक्रमणाची साखळी चीन मध्ये पर्यटनासाठी आलेल्या एका वयस्क जोडप्याशी जोडली गेली असून हे जोडपे एका पर्यटक गटाचाच एक भाग असल्याचे समजते. हा पर्यटक गट शांघाई, शिआन, गन्झू व मंगोलिया पर्यटनावर होता. त्यांच्या प्रवास मार्गावर संक्रमण झाल्याच्या अनेक केसेस समोर आल्या असून वरील प्रांतात अनेक स्थानिकांच्या संपर्कात हा गट आला होता असे सांगितले जात आहे. यात बीजिंगचाही समावेश आहे.

त्यामुळे अनेक शहरात स्थानिक प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर कोविड चाचण्या सुरु केल्या आहेत तर पर्यटन स्थळे, पिकनिक स्पॉट, शाळा, थियेटर्स बंद केली आहेत. ४० लाख वस्तीच्या लांझौ शहरात कडक लॉकडाऊन लागू झाला असून नागरीकाना घराबाहेर न पडण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत. विमानतळ बंद असून शेकडो उड्डाणे रद्द झाली आहेत. मंगोलियात करोना प्रकोपामुळे निर्बंध लावले गेल्याने कोळसा आयात पुन्हा ठप्प झाली असून त्यामुळे चीनवरचे वीज संकट अधिक गहिरे झाल्याचे ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे.