देशात काल दिवसभरात 15,786 कोरोनाबाधितांची नोंद, तर 231 जणांचा मृत्यू


नवी दिल्ली – देशावर ओढावलेल्या कोरोना महामारीचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. कारण काल दिवसभरात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मोठी घट पाहायला मिळाली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच दिलेल्या आकडेवारीनुसार काल दिवसभरात देशात 15 हजार 786 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर 231 बाधितांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोना मृताची संख्या 4 लाख 53 हजार 42 झाली आहे. याचदरम्यान काल देशाने 100 कोटी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा टप्पा पार केला.

दरम्यान देशातील उपचाराधीन बाधितांच्या आकडेवारीतही मोठी घट झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशात एक लाख 75 हजार 745 रुग्ण उपचाराधीन आहेत. तर काल दिवसभरात 18 हजार 641 जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. आतापर्यंत देशात तीन कोटी 35 लाख 14 हजार 449 लोकांनी कोरोनावर मात केली. देशात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या तीन कोटी 41 लाख 43 हजार 236 एवढी झाली आहे.

दुसरीकडे महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव आता कमी होत असल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. काल दिवसभरात राज्यात 1 हजार 573 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 2 हजार 968 बाधित यशस्वीरित्या कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत राज्यात 64 लाख 30 हजार 394 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.46 टक्के आहे. राज्यात काल दिवसभरात 39 बाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या राज्यात 24 हजार 292 अॅक्टिव्ह उपचार घेत आहेत.