लसीकरण मोहिमेत कोणताही भेदभाव न करता पार झाला 100 कोटींचा टप्पा : नरेंद्र मोदी


नवी दिल्ली – भारताने 100 कोटी कोरोना लसीकरणाचे कठीण पण असाधारण लक्ष्य पार केले. देशातील 130 कोटी जनतेचे सहकार्य आणि कर्तव्यशक्ती या पाठीमागे आहे. सर्व भारतीयांचे यासाठी अभिनंदन करतो. 100 कोटी लसीकरण फक्त ही फक्त संख्या नाही, देशातील जनतेच्या सामर्थ्याचे प्रतिबंब आहे. भारताची ही नवीन ताकद आहे. आपण ज्या वेगाने 100 कोटींचा टप्पा पूर्ण केला, जगभरातून त्याचे कौतुक करण्यात येत आहे. यादरम्यान कोणताही भेदभाव न करता लसीकरण करण्यात आले. त्याचबरोबर यामध्ये व्हीआयपी कल्चरचा शिरकाव करु दिला नाही. बड्या देशांना जे जमले नाही, ते भारताने करुन दाखवले, नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने विज्ञानवादी दृष्टीकोनातून मोहिमेला यश आल्याचे पतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

जगभरातील इतर देशांसोबत आज अनेक लोक भारताच्या लसीकरण कार्यक्रमाची तुलना करत आहे. भारताने ज्या वेगाने 100 कोटींचा टप्पा पार केला, त्याचे जगभरातही कौतुक होत आहे. हे सर्व सुरु असताना आपण सुरुवात कुठून केली, हे विसरत आहे. भारताला लस कोरोना महामारीच्या सुरुवातीला मिळेल का? भारत किती जणांचे लसीकरण करु शकतो? भारत कोरोना महामारीला थोपवू शकतो का? यासारख्या सर्व प्रश्नांना 100 कोटी लसीकरण उत्तर देत आहे.

भारताच्या आरोग्य व्यवस्थेवर 100 वर्षानंतर आलेल्या सर्वात मोठ्या महामारीनंतर प्रश्न उपस्थित करण्यात आले. भारत या महामारीचा कसा सामना करणार? भारताकडे इतर देशाकडून लस खरेदी करण्यासाठी पैसे कुठून येणार? भारताला कोरोना प्रतिबंधक लस कधी मिळणार? यासारख्या सर्व प्रश्नांची उत्तरे 100 कोटी लसीकरण आहे. सर्वांना सोबत घेऊन मोफत लसीकरणाची मोहीम सुरु केली. भारत गरीब-श्रीमंत, गाव-शहर असा महामारी भेदभाव करत नसल्यामुळे लसीकरणातही भेदभाव नाही. त्यामुळे लसीकरणात व्हिआयपी कल्चरचा शिरकाव होऊ दिला नसल्याचे मोदी म्हणाले. कोरोनासोबत भारतासारख्या लोकशाही देशात लढणे कठीण होईल, असे महामारीच्या सुरुवातीला म्हटले जात होते. भारतातील लोकांकडे संयम आणि शिस्त आहे का? पण आपण या सर्वांना लसीकरणातून उत्तर दिले आहे. आपल्यासाठी लोकशाही म्हणजे सबका साथ असल्याचेही ते म्हणाले.

तज्ज्ञ आणि देश-विदेशातील अनेक संस्था भारतामधील अर्थव्यवस्थेबाबत सकारात्मक आहेत. भारतात गुंतवणूकदार वाढत आहेत. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर रोजगारही उपलब्ध होत आहे. मोठी गुंतवणूक स्टार्टअपमध्ये सुरु आहे. सर्वात मोठी मेड इन इंडियाची ताकद आहे. स्वच्छ भरात अभियानाप्रमाणेच वोकल फॉर लोकलचाही नारा द्यायला हवा. भारतात तयार झालेल्या अथवा भारतीयांनी तयार केलेल्या गोष्टी खरेदी करायला हव्यात. मेड इन इंडियावर भर द्यायला हवा. भारतीयांच्या सहभागानंतरच हे सर्व यशस्वी होईल. सुरक्षा कितीही उत्तम असेल किंवा आधुनिक असेल. युद्ध जोपर्यंत सुरु आहे, शस्त्र तोपर्यंत टाकायची नाहीत. कोरोनाचे नियम सणासुदीच्या काळात पाळा, मास्क घाला, गर्दी टाळा. गेल्या दिवाळीपेक्षा यंदाची परिस्थिती चांगली आहे. पण, कोरोना नियमांचे पालन करा. मोठी आव्हाने कशी पेलायची हे भारताला चांगलेच माहित आहे. यासाठी आपल्याला सावध राहायला हवे. निष्काळजीपणा करुन चालणार नसल्याचे मोदी म्हणाले.