येतोय ट्रम्प यांचा ‘ट्रुथ सोशल’ सोशल मिडिया प्लॅटफॉर्म


अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर ट्विटर, फेसबुक या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मनी घातलेली बंदी अजून कायम असतानाच ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’ नावाने त्यांचा स्वतःचा सोशल मिडिया प्लॅटफॉर्म पुढील वर्षाच्या सुरवातीला लाँच केला जात असल्याची घोषणा केली आहे. त्यासंदर्भात एक जाहिरात प्रसिद्ध केली गेली असून ‘ट्रुथ सोशल’चे बीटा संस्करण नोव्हेंबर मध्ये आमंत्रित युजर्ससाठी उपलब्ध केले जात असल्याचे म्हटले गेले आहे.

ट्रम्प या संदर्भात म्हणतात आमचा ‘ट्रुथ सोशल’ प्लॅटफॉर्म तथाकथित उदार मिडिया संस्थानांचा प्रतिस्पर्धी म्हणून काम करेल. आज अशा जगात आपण राहतो जेथे तालिबानची ट्विटरवर मोठी उपस्थिती आहे आणि आपल्या आवडत्या राष्ट्राध्यक्षाला गप्प केले गेले आहे. ट्रम्प यांचा हा नवा प्लॅटफॉर्म ट्रम्प मिडिया अँड टेक्नोलॉजी ग्रुपने बनविला आहे.

ट्रम्प यांच्या मते सिलिकॉन व्हॅलीमधील बड्या कंपन्या एकतर्फी शक्ती बनल्या असून अमेरिकेतील विरोधी आवाज दाबत आहेत. नव्या प्लॅटफॉर्मचे ट्रम्प हेच अध्यक्ष असून हा प्लॅटफॉर्म अत्याचाराविरुद्ध लढणाऱ्या सर्वाना खुला आहे असे त्यांनी जाहीर केले आहे. येथे लवकरच व्हिडीओ सेवा सुरु केली जात असून त्यासाठी सभासद व्हावे लागणार आहे. या सोशल मिडिया प्लॅटफॉर्मचे एकूण मूल्य १.७ अब्ज डॉलर्स असल्याचे समजते.