भारतातून करोना निरोप घेण्याच्या तयारीत?


गेली दोन वर्षे पहिल्या, दुसऱ्या लाटेमुळे देशाला वेठीला ठरलेल्या करोनाची आता भारताचा निरोप घेण्याची तयारी सुरु आहे असे आशादायी चित्र निर्माण झाले आहे. करोनाची तिसरी लाट येऊ शकते असे गृहीत धरून केंद्र आणि राज्य सरकारे तयारीत असली तरी कोविड १९ च्या संक्रमण दराचे आकडे फारच आशादायक आहेत. सप्टेंबर पासून हा संक्रमण दर म्हणजे आर व्हॅल्यु १ च्या खाली आला आहे. आर व्हॅल्यु म्हणजे रीप्रोडक्शन नंबर. म्हणजे एक संक्रमित व्यक्ती किती जणांमध्ये करोना संक्रमित करू शकते त्याचा वेग. हा आकडा १ च्या खाली येणे म्हणजे संक्रमण वेग फारच हळू आहे असा होतो. आर व्हॅल्यु १ पेक्षा अधिक असेल तर संक्रमण वेग अधिक असतो.

चेन्नईच्या गणितीय विज्ञान संस्थान संशोधनात १० राज्यात उपचाराधीन सर्वाधिक केसेस मध्ये १८ ऑक्टोबर पर्यंत आर व्हॅल्यु १ किंवा त्यापेक्षा कमी आहे. या संस्थेतील संशोधक सिताभारा सिन्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार काही शहरात उपचाराधीन रुग्णांची संख्या वाढते आहे, कोलकाता मध्ये आर व्हॅल्यु १ पेक्षा जास्त दिसते आहे पण त्यामागे नुकताच पार पडलेला दुर्गा पूजा उत्सव हे कारण असू शकते.

बंगलोर मध्येही आर व्हॅल्यु १ असून चेन्नई, पुणे, मुंबई मध्ये ती १ पेक्षा कमी आहे. देशात सरासरी हा आकडा ०.९० वर आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार मार्च ते मे मध्ये करोनाची दुसरी लाट होती पण त्याची तीव्रता कमी झाली आहे. मंगळवारी १३०५८ नवीन रुग्ण आढळले असून २३१ दिवसातली ही सर्वात कमी संख्या आहे.