नवाब मलिकांचे भरसभेत समीर वानखेडेंना आव्हान; तुरुंगात टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही


पुणे – एनसीबीचे क्षेत्रीय संचालक समीर वानखेडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्यामध्ये आर्यन खान प्रकरणानंतर सातत्याने आरोप-प्रत्यारोप होत आहेत. क्रूजवर टाकण्यात आलेल्या छाप्यावर देखील नवाब मलिक यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले असताना आता त्यांनी थेट समीर वानखेडे यांच्यावरच गंभीर आरोप केले आहेत. सगळे सेलिब्रिटी कोरोना काळात मालदीवमध्ये असताना समीर वानखेडे आणि त्यांचे कुटुंबीय मालदीवमध्ये होते, असा खळबळजनक दावा नवाब मलिक यांनी केला आहे. तसेच, त्यासंदर्भातील फोटो देखील आपण देणार असल्याचे नवाब मलिक म्हणाले आहेत. दरम्यान, समीर वानखेडे यांना याप्रकरणात तुरुंगात टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही, असे थेट आव्हानच नवाब मलिक यांनी दिल आहे.

समीर वानखेडे यांना वर्षभरात तुरुंगात टाकेल, असे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक म्हणाले. माझ्या जावयाला तुरुंगात टाकले आणि आता फोन करत आहेत की यात माझा संबंध नाही. समीर वानखेडे यांना तुरुंगात टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही, असे मलिक पिंपरी चिंचवडमध्ये म्हणाले. खोट्या केसेस एनसीबी दाखल करत आहे. हे सिद्ध केल्याशिवाय आम्ही थांबनार नाही. हे अधिकारी आणि भाजपचे नेते लोकांवर दबाव निर्माण करुन या संस्थेच्या मार्फत हजारो कोटींचा वसुलीचा व्यवसाय महाराष्ट्रात करत आहेत. यांचा घोटाळा उघडीस आणल्याशिवाय मी गप्प बसणार नसल्याचा इशारा नवाब मलिक यांनी दिला.

वानखेडेंना मी आव्हान देतो, त्यांची नोकरी वर्षभरात जाईल. तुम्ही आम्हाला तुरुंगात टाकायला पुढे आले होते. आता देशातील जनता तुम्हाला तुरुंगात जाताना बघेल. तुम्ही किती बोगस माणूस आहात याचे आमच्याकडे पुरावे आहेत. आगामी काळात ते पुरावे आम्ही बाहेर काढणार आहोत. माझ्या जावयाला तुरुंगात टाकण्यासाठी त्यांच्यावर वरुन दबाव होता, असे वानखेडे सांगतात. पण आता नवाब मलिक कुणाच्या बापाला घाबरत नसल्याचा इशारा नवाब मलिक यांनी दिला.

नवाब मलिक म्हणाले, राज्यात ईडी, सीबीआय, एनसीबी संस्थांचा वापर करुन सरकार पाडण्याचा डाव सुरु आहे. पण कुठलाही मंत्री घाबरणार नाही. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत आहेत. अर्धे मंत्रिमंडळ तुरुंगात जाईल. पण अशा पोकळ धमक्यांना घाबरणारे हे महाविकास आघाडीचे सरकार नाही. तुम्हाला नेस्तनाबूत केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही.