केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात मोठी वाढ


नवी दिल्ली – आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित असलेल्या महागाई भत्त्यावर निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रातील मोदी सरकारने केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिवाळी भेट दिली आहे. महागाई भत्त्यामध्ये तीन टक्के वाढ करण्यात आली आहे. तर डीआरमधील वाढीलाही ग्रीन सिग्नल दिला आहे. 47 लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणि 68.62 लाख पेन्शनधारकांना केंद्र सरकारच्या या निर्णयाचा फायदा होणार आहे. हा महागाई भत्ता एक जुलैपासून लागू होणार आहे.

देशातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता मे 2020 पासून 30 जून 2021 पर्यंत केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता थांबवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर 1 जुलै 2021 नंतर तो पूर्ववत करण्याचे निर्देश दिले होते. यावर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्र सरकारने एक जुलै 2021 पासून केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेतला होता. 11 टक्के असणारा महागाई भत्ता 17 टक्केंनी वाढून आता 28 टक्के एवढा करण्यात आला आहे. वाढत्या महागाईमुळे वस्तूंच्या किमती देखील वाढत जातात. त्यामुळे लोकांजवळ असलेल्या पैशांची क्रय क्षमता कमी होत जाते. यासाठी सरकार कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देते. त्यामुळे कर्मचाऱ्यांना वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी मदत होते.

केंद्रीय कर्मचाऱ्यांसह इतर पेन्शनधारक लोकांना केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे लाभ होणार आहे. देशात कोरोनाचा प्रकोप सुरु झाल्यानंतर अर्थव्यवस्थेवरील वाढता ताण पाहता महागाई भत्ते वाढवण्यावर निर्बंध आणले होते. मागील वर्षी कोरोना महामारी सुरु झाल्यानंतर एप्रिल महिन्यात केंद्रीय कॅबिनेटने सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता दोन हफ्त्यात देण्यावर बंदी आणली होती.