इम्रान खान यांनी १० लाख डॉलर्सचे घड्याळ गुपचूप विकले


लाहोर – सत्तेवर नव्या पाकिस्तानचे आश्वासन देऊन आलेल्या इम्रान खान यांनी देशाला अधिक गरीब बनवले आहे. तर दुसरीकडे परदेशातून मिळालेल्या भेटवस्तू विकून पंतप्रधान इम्रान खान आपली संपत्ती वाढवत असल्याचा आरोप पाकिस्तानच्या मुख्य विरोधी पक्षांनी केला आहे. त्यामुळे परदेशातून मिळालेल्या भेटवस्तूंच्या प्रकरणात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान अडकले आहेत.

त्या वस्तू विकून देशाच्या सरकारी तिजोरीचे पाकिस्तानी पंतप्रधानांनी मोठे नुकसान केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. परदेशी भेटवस्तूंवरून इम्रान खान यांच्यावर पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांची मुलगी मरियम यांनी जोरदार हल्ला चढवला आहे आणि म्हटले आहे की, इम्रान खान यांनी भेटवस्तू लुटल्या आहेत.

इतर देशांकडून मिळालेल्या भेटवस्तू पंतप्रधान इम्रान खान यांनी बेकायदेशीरपणे विकल्या, ज्यात एक दशलक्ष डॉलर्स किंमतीच्या महागड्या घड्याळाचा समावेश असल्याचे पाकिस्तानमधील विरोधी पक्षांनी म्हटले आहे. राष्ट्राचे प्रमुख आणि घटनात्मक पदांवर असलेले अधिकारी यांच्यात अधिकृत भेटींमध्ये भेटवस्तूंची देवाणघेवाण केली जाते. पाकिस्तानच्या गिफ्ट डिपॉझिटरीमधील नियमांनुसार, या भेटवस्तू राष्ट्राची मालमत्ता आहेत. जोपर्यंत त्यांचा उघड लिलाव होत नाही. नियमांनुसार, अधिकारी १०,००० रुपयांच्या खालच्या किमतीच्या भेटवस्तू स्वतः जवळ ठेवू शकतात.

यासंदर्भात पीएमएल-एनच्या उपाध्यक्ष मरियम नवाज यांनी उर्दूमध्ये ट्वीट केले आहे. इतर देशांकडून मिळालेल्या भेटवस्तू इम्रान खान यांनी विकल्या आहेत. इम्रान खान एकीकडे तोशाखानाच्या भेटवस्तू लुटल्या आणि तुम्ही मदिना सारखे राज्य स्थापन करण्याची चर्चा करता? एखादी व्यक्ती एवढी असंवेदनशील, बहिरा, मूका आणि आंधळा कसा असू शकतो? असे मरियम नवाज यांनी म्हटले आहे.

इम्रान खान यांच्यावर विरोधी पक्ष पाकिस्तान डेमोक्रॅटिक मूव्हमेंट (PDM) चे प्रमुख मौलाना फजलूर रहमान यांनीही आरोप केले आहेत. एका राजकुमाराला पंतप्रधान इम्रान खान यांनी महागडे घड्याळ विकल्याच्या बातम्या आहेत. हे लाजीरवाणे आहे. अशा बातम्या सोशल मीडियावर येत आहेत की इम्रान खान यांना एका आखाती देशाच्या राजपुत्राने दहा लाख अमेरिकन डॉलर्सचे घड्याळ भेट दिले होते. हे घड्याळ दुबईमध्ये इम्रान खानच्या एका जवळच्या मित्राने दहा लाख डॉलर्सला विकत घेतले आणि ते पैसे इम्रान खानला दिले. भेटवस्तूंच्या विक्रीबद्दल राजाला कळले आहे, असे मौलाना फजलूर रहमान असे म्हटले आहे. दरम्यान, पाकिस्तान सरकारने या प्रकरणाला इस्लामाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सरकारने असा युक्तिवाद केला की पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तूंचे तपशील वर्गीकृत म्हणून केले गेले आहेत.