एकनाथ खडसेंना अटकेपासून एक आठवडा संरक्षण


मुंबई – एकनाथ खडसे यांच्यावर पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी सुरू असलेल्या चौकशीदरम्यान आता त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. खडसे यांना एक आठवडा अटकेपासून संरक्षण देण्यात आले आहे. हा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.

खडसे यांची पत्नी मंदाकिनी खडसे यांच्याविरोधात काही दिवसांपूर्वीच मुंबई सत्र न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. त्यांनी या प्रकरणी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. पण, त्यांचा अर्ज सुनावणीदरम्यान फेटाळून लावत त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिली होती. यासंदर्भात अंजली दमानिया यांनीच तक्रार दाखल केली होती. दरम्यान, त्याचवेळी एकनाथ खडसे यांना मात्र वैद्यकीय कारणांमुळे दिलासा मिळाला होता. त्यांच्याबाबत पुढील सुनावणी आज झाली. या सुनावणीनंतर हा निकाल देण्यात आला.

काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांची पुण्यातील भोसरी जमीन व्यवहारातील कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीकडून चौकशी देखील करण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई होण्याची देखील शक्यता वर्तवली जात होती. पण, प्रकृती अस्वास्थ्यामुळे एकनाथ खडसे यांना मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागले. पण या प्रकरणामध्ये अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांनी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता. पण, तो अर्ज न्यायालयाने फेटाळून लावत त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.

ईडीने भोसरी जमीन प्रकरणात सत्र न्यायालयापुढे दाखल केलेल्या चार्जशीटसंदर्भात मंदा खडसे यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. पण हे ऐकून वाईट वाटते. कारण कर्ते-करविते कोण होते आणि भोगायला कुणाला लागत आहे. कारण एकनाथ खडसेंनी केलेल्या चुकीच्या कामाचे हाल त्यांच्या पत्नी आणि त्यांच्या जावयाला भोगावे लागत आहेत. पण यातून मार्ग तरी नक्कीच निघेल. त्यांनी केलेला भ्रष्टाचार नक्कीच पुढे येईल. सगळे राजकारणी प्रकृतीचे कारण सांगून जेलमधून किंवा तपासातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतात. पण त्यांना लवकरात लवकर कायद्याला सामोरे जावे लागणार असल्याचे अंजली दमानिया त्यावेळी म्हणाल्या होत्या.