दुबईची जम्मू काश्मीरमध्ये गुंतवणूक, पाकिस्तानची गोची


युएई आणि भारत सरकार यांच्यात नुकत्याच झालेल्या करारानुसार दुबई जम्मू काश्मीर मध्ये पायाभूत सुविधा, मेडिकल कॉलेज, आयटी टॉवर, वाहतूक पार्क, औद्योगिक पार्क क्षेत्रात मोठी गुंतवणूक करणार आहे. यामुळे शेजारी पाकिस्तानचा जळफळाट झाला असून पाकिस्तानचे नेते हा पाकिस्तानचा पराभव असल्याचे सांगू लागले आहेत. जम्मू काश्मीर मुद्द्यावर भारत कुटनीती पातळीवर पाकिस्तानना घेरण्याची मोठी तयारी करत असून विविध मुस्लीम देशांनी जम्मू काश्मीर मध्ये गुंतवणूक करावी यासाठी एक मोठी मोहीम राबवत आहे. जम्मू काश्मीरसाठीचे ३७० कलम हटविल्यानंतर दोन वर्षांनी केंद्र सरकारने हा महत्वपूर्ण करार केला आहे.

मुस्लीम देशांनी जम्मू काश्मीर मध्ये गुंतवणूक केली तर राज्याचा विकास गतीने होणार आहे. जम्मू काश्मीर प्रश्नावर पाकिस्तान गेली कित्येक वर्षे मुस्लीम देश समूहाच्या आश्रयाने आवाज उठवत आहे. त्याचा परिणाम म्हणून ५० पेक्षा अधिक मुस्लीम देशांनी संधी साधून भारतविरुद्ध आपत्तीजनक वक्तव्ये केली होती. मात्र ३७० कलम रद्द केल्यावर युएई आणि अन्य काही देशांनी जम्मू काश्मीर हा भारताचा अंतर्गत प्रश्न असल्याचे सांगून कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती.

इराण सह किमान सहा मुस्लीम देश जम्मू काश्मीर मध्ये गुंतवणूकीसाठी उत्सुक असून केंद्र सरकारच्या संपर्कात आहेत असे समजते. यामुळे जम्मू काश्मीर मध्ये मोठ्या प्रमाणावर स्थानिक रोजगार मिळणार आहे तसेच दहशतवादाला आपोआप आळा बसेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.