आर्यन खानच्या न्यायालयीन कोठडीत 30 ऑक्टोबरपर्यंत वाढ


मुंबई: अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचे ड्रग्स प्रकरणी पाय आणखी खोलात जात असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. आज देखील शाहरूख खान आणि गौरीला दिलासा मिळाला नाही. 26 ऑक्टोबरला आर्यन खानची ड्रग्स प्रकरणी सुनावणी होणार होती. आर्यन 26 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीमध्ये होता. पण ही कोठडी आणखी 4 दिवस वाढवण्यात आली आहे. आर्यनला 30 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. त्यामुळे आता आर्यनला त्यानंतर तरी दिलासा मिळणार का असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

तर दुसरीकडे अभिनेत्री अनन्या पांडेच्या घरी आज एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली आहे. आर्यन खान प्रकरणात अनन्याचे नाव आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आर्यन खानच्या अडचणी आता दिवसेंदिवस वाढत चालल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्याला 30 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत राहावे लागणार आहे. तर दिवाळीआधी जामीन मिळणार का? की आर्यनची दिवाळीही कोठडीत जाणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

दरम्यान आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात नवी माहिती पुढे आली आहे. एनसीबीने अभिनेत्री अनन्या पांडे हिच्या वांद्रे येथील घरावर छापा मारला आहे. अनन्या हिच्या पाली हिल येथील निवासस्थानी शोधमोहीम राबवली गेली. यावेळी काही वस्तू एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्या आहेत.

NCB ने आर्यन खानवरील आरोपांबद्दल बोलताना, त्याच्यावर ड्रग्ज घेतल्याबद्दल आणि आंतरराष्ट्रीय ड्रग ट्रॅफिकिंगशी संबंधित असल्याचा खटला दाखल केला आहे.आर्यन खानची जामीन याचिका दंडाधिकारी आणि सत्र न्यायालयाने फेटाळली आहे. आता त्याच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आर्यन खानच्या जामीन अर्जावर मंगळवारी, 26 ऑक्टोबर रोजी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दरम्यान, त्याला कारागृहातच राहावे लागेल.