भारतात पुन्हा भरपूर पगाराच्या नोकऱ्यांचा सुकाळ


करोना काळात घसरलेली देशाची आर्थिक परिस्थिती वेगाने सुधारत असून या वर्षी तसेच पुढच्या वर्षात पुन्हा एकदा भरपूर पगारी नोकऱ्यांचे युग येईल असे संकेत मिळत आहेत. जागतिक सल्लागार, ब्रोकिंग व समाधान कंपनी ‘विलीस टॉवर्स वॉटसन’ च्या रिपोर्टनुसार भारतात २०२१ मध्ये कर्मचारी पगारात किमान ८ टक्के वाढ अपेक्षित आहे तर पुढील वर्षात ही वाढ सरासरी ९.३ टक्क्यांवर जाईल. कंपन्यांसमोर कर्मचारी आकर्षित करणे आणि आहेत ते टिकवून ठेवण्याचे मोठे आव्हान आहे आणि त्यामुळे भरपूर पगारवाढ देणे भाग पडणार आहे.

जागतिक पातळीवर आशिया पॅसिफिक क्षेत्रात पुढच्या वर्षात सर्वाधिक पगारवाढ मिळेल आणि त्यातही भारत ९.३ टक्क्याच्या सरासरी पगारवाढीने आघाडीवर असेल. पुढच्या १२ महिन्यात बिझिनेस आउट लुक मध्येही सुधारणा होण्याचे संकेत मिळत आहेत. हे सर्व्हेक्षण मे जून २०२१ मध्ये केले गेले असून त्यात आशिया पॅसिफिक क्षेत्रातील १४०५ कंपन्या सामिल केल्या गेल्या होत्या. त्यात भारतातील ४५३ कंपन्या होत्या. ५२ टक्के भारतीय कंपन्यात पुढच्या १२ महिन्यात रेव्हेन्यू वाढ सकारात्मक असेल आणि ३० टक्के कंपन्या पुढच्या वर्षात कर्मचाऱ्यांची मेगा भरती करतील असे दिसून आले आहे.

या नव्या भरतीत अभियांत्रिकी क्षेत्रातील ५७.५, माहिती तंत्रज्ञान ५३.३, तंत्रज्ञान कौशल्य ३४.२ सेल्स ३७, आणि फायनान्स क्षेत्रात ११.६ टक्के कंपन्या सर्वाधिक कर्मचारी भरती करतील असे नमूद केले गेले आहे.