बंगळुरु – राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करताना कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जनता दलाचे (सेक्यूलर) नेते कुमारस्वामी यांनी मोठे वक्तव्य केले आहे. शिकण्यासारखे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखांमध्ये काही नसून तिथे प्रशिक्षण घेणारे लोक अधिवेशनादरम्यान विधानसभेत ब्ल्यू फिल्म्स पाहत असतात, असे वक्तव्य कुमारस्वामी यांनी केले आहे. कुमारस्वामी यांना आरएसएसच्या शाखेला भेट देऊन तिथे होणाऱ्या गोष्टींबद्दल जाणून घेण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष नलीन कुमार कटील यांनी निमंत्रण दिले आहे. त्यांनी ही टीका यासंबंधी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर उत्तर देतानाच केली.
संघाच्या शाखेतून प्रशिक्षण घेणारे लोक अधिवेशनादरम्यान विधानसभेत ब्ल्यू फिल्म्स पाहत असतात – कुमारस्वामी
आरएसएसची सोबत मला नको आहे. आरएसएसच्या शाखांमध्ये काय शिकवले जाते, हे आपण पाहिले नाही का? विधानसभेत कसे वागावे, हे लोक अधिवेशन सुरु असताना ब्ल्यू फिल्म्स पाहत असतात. त्यांना (भाजपला) हीच गोष्ट आरएसएसच्या शाखेत शिकवली जात नाही का? हे शिकवण्यासाठी आरएसएस शाखेत मला जाण्याची गरज आहे का?, अशी विचारणा कुमारस्वामी यांनी केली आहे.
कुमारस्वामी पोटनिवडणूक प्रचाराच्या निमित्ताने प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, त्यांच्या शाखेची मला गरज नाही. जे काही शाखेकडून शिकायचे आहे, मी गरीबांच्या शाखेकडून ते शिकलो आहे. मला आरएसएस शाखेकडून शिकण्यासारखे काही नाही.
२०१२ मधील एका घटनेचा संदर्भ देत कुमारस्वामी बोलत होते. भाजपच्या तीन मंत्र्यांना अधिवेशनादरम्यान जेव्हा मोबाइलमध्ये पॉर्न व्हिडीओ पाहताना पकडण्यात आले होते. तेव्हा या घटनेनंतर गदारोळ झाला होता. भाजप सरकारसमोरही मोठी अडचण निर्माण झाली होती. अखेर तीन मंत्र्यांनी राजीनामा दिला होता.
दरम्यान कुमारस्वामी यांनी नुकताच, आरएसएस एका छुप्या अजेंडाचा भाग असून देशभरातील वेगवेगळ्या संस्थांमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांची टीम तयार केल्याचा आरोप केला होता. केंद्रात आणि कर्नाटकात आरएसएस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सांगण्यानुसार सरकार काम करत असल्याचा आरोप करत त्यांनी ‘बाहुले’ असा उल्लेख केला होता. यानंतर भाजप प्रदेशाध्यक्षांनी कुमारस्वामी यांना संघाच्या शाखेत येण्याचे आमंत्रण दिले होते.