या देशांचे नागरिकत्व मिळविणे तुलनेने खुपच सहज


अमेरिकेचे नागरिकत्व मिळविण्यासाठी अनेक लोक वर्षानुवर्षे प्रतीक्षा करतात पण अमेरिकेचे नागरिकत्व मिळविणे इतके सोपे नाही. मात्र जगात अनेक देश असे आहेत ज्यांचे नागरिकत्व मिळविणे तुलनेने खुपच सहज सोपे आहे. अमेरिकेच्या नागरिकत्वासाठी अनेक अडचणी पार कराव्या लागत असल्या तर अमेरिकेला लागून असलेल्या कॅनडाचे नागरिकत्व मिळविणे फारसे अवघड नाही.

कॅनडाचे नागरिकत्व मिळविताना प्रथम कायम रहिवासी दाखला मिळविण्यासाठी अर्ज केल्यावर पाच वर्षात १०९५ दिवस वास्तव्य झाल्याचे प्रमाणपत्र, पाच वर्षातील ३ वर्षांचे आयकर फायलिंग आणि इंग्रजी किंवा फ्रेंच भाषा येणे हे आवश्यक आहे तसेच देशाचा इतिहास, संस्था, अधिकार या संदर्भात एक परीक्षा द्यावी लागते.

आयर्लंडचे नागरिकत्व मिळविण्यासाठी तुमचे माता पिता, आजी आजोबा कुणी आयरिश असतील तर ते लगेच मिळते. पण समजा तसे नसेल तरी नागरिकत्वासाठी अर्ज करता येतो. त्यासाठी गेल्या आठ वर्षात एका जागी ४ वर्षे राहिल्याचा पुरावा आणि पाच वर्षाचा निवास पुरावा दाखवावा लागतो. आर्मेनियाचे नागरिकत्व घेण्यासाठी ३ वर्षे लागतात. त्यात पहिल्यांदा आर्मेनियाचा निवासी परवाना घ्यावा लागतो आणि हा परवाना मिळण्यासाठी त्या देशात गुंतवणूक करावी लागते. विश्वविद्यालयात प्रवेश घेऊन त्यानंतर ३ वर्षांनी नागरिकत्व साठी अर्ज करता येतो.

पोर्तुगालचे नागरिकत्व मिळविणे तुलनेने अधिक सोपे आहे. त्यासाठी तेथे राहायला जायचे. पाच वर्षे राहिल्यावर ऑनलाईन वर्कर व्हीजाच्या माध्यमातून नागरिकत्वासाठी अर्ज करता येतो. त्यासाठी एका वर्षात किमान चार महिने आणि प्रत्येक दोन वर्षात किमान १६ महिने तेथे वास्तव्य असणे आवश्यक आहे. श्रीमंत व्यक्तींना पोर्तुगाल गोल्डन विसा कार्यक्रम अंतर्गत फास्ट ट्रॅक रेसिडन्सी पर्याय देते.

पॅराग्वे या दक्षिण अमेरिकन देशात तीन वर्षात नागरिकत्व मिळते. त्यासाठी बँक खात्यात ५ हजार डॉलर्स आणि वर्षातील किमान १८३ दिवस वास्तव्य करावे लागते. पॅराग्वे पासपोर्टवर १४३ देशात व्हिसा मुक्त प्रवास करता येतो.