देवेंद्र फडणवीस बनले ‘मॅन ऑफ द लेटर्स’


माजी मुख्यमंत्री आणि आताचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी एक नवे रेकॉर्ड केले असून त्यामुळे त्यांना ‘मॅन ऑफ द लेटर्स’ अशी नवी ओळख मिळाली आहे. माहिती अधिकार अंतर्गत पुण्याचे सामाजिक कार्यकर्ते प्रफुल्ल सारडा यांनी आरटीआय अंतर्गत अर्ज करून मागविलेल्या माहितीतून फडणवीस यांनी गेल्या २२ महिन्यात म्हणजे साधारण पावणेदोन वर्षात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विविध विषय संदर्भात २३१ पत्रे पाठविल्याचे दिसून आले आहे.

ही सर्व पत्रे राज्याच्या विविध प्रश्न, प्रगतीचे मार्ग या संदर्भात आहेत असेही समजते. सारडा या संदर्भात म्हणाले, देवेंद्र फडणवीस अनेकदा ट्विटरवरून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असे असे ट्विट करतात असे लक्षात आले. गेल्या दीड वर्षात अनेकदा असे ट्विट वाचल्यावर त्यातील सत्यता पाहण्यासाठी सारडा यांनी आरटीआय कडे फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रांची माहिती मिळण्यासाठी अर्ज केला तेव्हा या काळात २३१ पत्रे ठाकरे यांना लिहिली गेल्याचे उत्तर मिळाले.

अर्थात यावर शिवसेनेचे उपनेते डॉ. रघुनाथ कुचीक यांनी फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री बनण्यासाठी धडपड करत असल्याचे सिद्ध होत आहे अशी टिपण्णी केली आहे. फडणवीस यांनी इतकी पत्रे ठाकरे यांनी लिहिण्यापेक्षा काही पत्रे केंद्र सरकारला लिहून महाराष्ट्राचे जीएसटीचे केंद्राने अडकविलेले ३० हजार कोटी देण्याविषयी सांगायला हवे होते असेही ते म्हणाले. भाजपचे राम कदम यांनी फडणवीस यांनी ठाकरे यांना लिहिलेली पत्रे व्यक्तिगत नाहीत तर महाराष्टाच्या प्रगतीसाठी काय करता येईल आणि राज्यापुढे असलेले विविध प्रश्न या संदर्भात आहेत असे म्हटले आहे. सारडा यांच्या म्हणण्यानुसार फडणवीस यांनी दरमहा सरासरी १० पत्रे मुख्यमंत्र्यांना लिहिली असून यामुळे एक नवे रेकॉर्ड नोंदले गेले आहे.

सारडा यांच्या म्हणण्यानुसार यापूर्वी राजकीय नेते आणि पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्रयुद्ध काळात तुरुंगातून प्रियदर्शनी इंदिरा गांधी यांना पत्रे लिहिली होती. ती ‘लेटर्स फ्रॉम फादर टू हिज डॉटर’ नावाने प्रसिद्ध असून त्याचे एक पुस्तक प्रसिद्ध झाले आहे. नेहरू यांनी जितकी पत्रे लिहिली त्याच्या ७ पट अधिक पत्रे फडणवीस या दुसऱ्या राजकीय नेत्याने लिहिली असून ती सर्व महाराष्ट्र राज्य किंवा राजकीय मुद्द्यावर लिहिली आहेत.