नवी दिल्ली : एक महत्वाची सूचना काऊन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफेकेट एक्झामिनेशनकडून (CISCE) जारी करण्यात आली आहे. सीआयएससीई बोर्डकडून घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या तारखा लवकरच बोर्डची अधिकृत वेबसाईट cisce.org वर जाहीर करण्यात येतील, असेही स्पष्ट केले आहे.
ICSE, ISC दहावी, बारावी बोर्डाची सेमीस्टर 1 परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय
15 नोव्हेंबर 2021 रोजी ICSE, ISC सेमीस्टर 1 परीक्षा या सुरु होणार होत्या, तर त्या डिसेंबर 2021 मध्ये संपणार होत्या. 6 डिसेंबरला दहावीच्या परीक्षा तर 16 डिसेंबरला बारावीच्या परीक्षा समाप्त होणार होत्या. सीआयएससीईने जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये सांगण्यात आले आहे की या परीक्षा काही अपरिहार्य कारणांमुळे स्थगित करण्यात आल्या असून परीक्षेचे नवे वेळापत्रक विद्यार्थ्यांना लवकरच देण्यात येईल. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी बोर्डच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
या सूचनेची सर्व विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी दखल घ्यावी, नव्या तारखा लवकरच जाहीर करण्यात येतील, असे बोर्डाने सांगितले, असले तरी या तारखा नेमक्या कधी जाहीर करण्यात येतील, याची मात्र स्पष्टता देण्यात आलेली नाही. काही महत्वाचा निर्णय बोर्डाने घेतला असला तरी त्याची माहिती बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.
सीआयएससीईने या आधी जाहीर केलेल्या नियमानुसार, परीक्षेचा कालावधी हा एक तासांचा असल्याचे सांगण्यात आले होते. काही परीक्षा या दीड तासांच्या कालावधीच्या असतील. पण आता याबाबतही लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून सर्व परीक्षांचा कालावधी दीड तासांचा करण्यात येणार आहे.