एनडीपीएस न्यायालयाकडून आर्यन खानला दिलासा नाही; जामीन नाकारला


मुंबई – आज न्यायालयाने शाहरुख खानचा मुलगा आर्यनच्या जामिनावर निर्णय दिला आहे. सध्या मुंबईतील आर्थर रोड जेलमध्ये आर्यन आहे. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकल्यानंतर त्याला अटक केली होती. १३ ऑक्टोबर रोजी आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी केल्यानंतर न्यायाधीशांनी निकाल राखून ठेवला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायाधीश व्ही.व्ही.पाटील यांनी आपण २० ऑक्टोबर रोजी निकाल देणार असल्याचे सांगितले होते. दरम्यान विशेष न्यायालयाने आर्यन खानला जामीन नाकारला आहे. त्याच्यासोबतच अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा या दोघांचे जामीन अर्जही फेटाळण्यात आले.

न्यायालयाने आर्यन खानच्या जामिनावर प्रदीर्घ चर्चेनंतर अखेर आपला निर्णय दिला आहे. एनडीपीएस न्यायालयाने आजही त्याला जामीन मंजूर केलेला नाही. एनसीबीने न्यायालयात बुधवारी आर्यनचे असे काही चॅट सादर केले, जे ड्रग्ज संबंधित होते. जामिनावर न्यायालयात गेल्या सुनावणी दरम्यान, एनसीबीने म्हटले की, आर्यन खान गेल्या काही वर्षांपासून नियमितपणे ड्रग्ज घेत होता, असे पुरावे दर्शवतात. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने असेही म्हटले होते की आर्यनच्या ताब्यातून काहीही सापडले नाही, पण त्याच्या चॅटमधून त्याचा आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेटशी संबंध असल्याचे उघड होत आहे.

एनसीबीने जामीनाच्या सुनावणीआधी आर्यन खानने एका अभिनेत्रीसोबत ड्रग्जसंबंधी चॅटिंग केल्याची माहिती न्यायालयात दिली आहे. एनसीबीने हे संभाषण न्यायालयात सादर केले आहे. गेल्या सुनावणीत एनसीबीने न्यायालयात ही माहिती दिली आहे. एनसीबीने आर्यन खानच्या मोबाइलमधील चॅटिंग तपासले असून याआधीही अनेक संभाषणांचा उल्लेख केला आहे. दरम्यान यावेळी आर्यन खानने एका नवोदित अभिनेत्रीसोबतही ड्रग्जसंबंधी चॅट केल्याचे समोर आले आहे. २ ऑक्टोबरला झालेल्या क्रूझ पार्टीतील ड्रग्जसंबंधी दोघांमध्ये बोलणे झाले होते. याच पार्टीनंतर आर्यन खानला एनसीबीने ताब्यात घेत नंतर अटकेची कारवाई केली होती.