फिलिपिन्समधून अंडरवर्ल्ड डॉन सुरेश पुजारीला अटक!


नवी दिल्ली – अखेर मुंबई पोलिसांना कधीकाळी अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीसाठी काम करणाऱ्या सुरेश पुजारीला बेड्या ठोकण्यात यश आले आहे. पोलीस गेल्या अनेक वर्षांपासून सुरेश पुजारीच्या मागावर होते. सुरेश पुजारीने २००७मध्ये भारताबाहेर पलायन केले होते. तेव्हापासून पोलिसांकडून त्याला अटक करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात होते. अखेर, पोलिसांच्या प्रयत्नांना यश आले असून सुरेश पुजारीला फिलिपिन्समधून अटक करण्यात आली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार १५ ऑक्टोबरला सुरेश पुजारीला अटक करण्यात आल्याचे वृत्त नवभारत टाईम्सने दिले आहे. आता त्याचे फिलिपिन्समधून भारताकडे प्रत्यार्पण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

मुंबई पोलिसांप्रमाणेच एफबीआय आणि सीबीआयच्या देखील रडारवर सुरेश पुजारी होता. त्याला एफबीआयनेच संयुक्त कारवाईमध्ये अटक केल्याची माहिती मिळत आहे. सुरेश पुजारीच्या मागावर गेल्या अनेक दिवसांपासून महत्त्वाच्या तपास यंत्रणा होत्या. गेल्या महिन्यात २१ सप्टेंबर रोजी सुरेश पुजारी फिलिपिन्समध्ये असल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली होती. केंद्रीय तपास यंत्रणांनी याची माहिती इंटरपोलला दिल्यानंतर त्याच्या अटकेसाठी पावले उचलण्यात आली. अखेर त्याला फिलिपिन्सच्या परांकी शहरातून एका इमारतीच्या बाहेर तो उभा असताना अटक करण्यात आली आहे.