हे आहे जगातील सर्वात छोटे वर्किंग रिव्हॉल्व्हर


बंदुकांचा अनेकांना शौक असतो, अनेक लोक सुरक्षेसाठी पिस्तुल परवाने घेतात, कुणी दिखावा म्हणून असे परवाने घेतात आणि गुन्हेगार तर परवाने न घेताच अशा शस्त्रांचा वापर करतात हे आपण पाहतो. पण जगातील सर्वात छोटे रिव्हॉल्व्हर केवढे असू शकेल याची आपल्याला कल्पना नसते. अगदी खेळण्यातले वाटावे इतके छोटे, खरे पिस्तुल स्वीस मिनी गन नावाने प्रसिद्ध असून या रिव्हॉल्व्हरची नोंद जगातील सर्वात छोटे वर्किंग रिव्हॉल्व्हर म्हणून गिनीज बुक मध्ये केली गेली आहे. दिसायला अगदी चिमुकल्या या रिव्हॉल्व्हरची किंमत ५ लाख रुपयांपेक्षा अधिक आहे.

या रिव्हॉल्व्हरची लांबी फक्त ५.५ सेंटीमीटर असून उंची ३.५ सेंटीमीटर व रुंदी १ सेंटीमीटर आहे. त्याचे वजन आहे १९.८ ग्रॅम. हे हातात सहज लपविता येते. अमेरिका आणि ब्रिटन मध्ये या रिव्हॉल्व्हरच्या आयातीवर बंदी आहे. साईज छोटा असला तरी त्याचे सर्व फिचर्स मोठ्या रिव्हॉल्व्हर प्रमाणे आहेत. स्वीस वॉचमेकिंग आणि ज्वेलरी इंडस्ट्री मध्ये वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानाचा वापर हे रिव्होल्व्हर बनविताना केला जातो. रिव्हॉल्व्हर सी१एसटी स्टेनलेसस्टील मॉडेल बरोबर स्टायलीश लेदर होल्डर येतो आणि २४ जिवंत व २४ ब्लँक काडतुसे सुद्धा मिळतात. की-रिंगच्या सहाय्याने ते बेल्ट मध्ये अडकवता येते.

या रिव्हॉल्व्हरचे गोल्डन व्हर्जन सुद्धा आहे. पण ते मात्र खास ऑर्डरवरून बनविले जाते. या रिव्हॉल्व्हरने कुणाचाही जीव घेता येतो असे म्हटले जाते. पण उत्पादकांच्या म्हणण्यानुसार या रिव्हॉल्व्हरने कुणाचाही सहज जीव घेणे अवघड आहे. कारण त्याची पॉवर १ जूल पेक्षा कमी आहे. त्यामुळे खोपडीच्या अगदी नाजूक जागी अगदी जवळ जाऊन आणि एकाग्रतेने गोळी झाडली तर संबंधित व्यक्ती जखमी होऊ शकेल किंवा एखाद्यावेळी ही गोळी त्या व्यक्तीचा प्राण घेऊ शकेल असे त्यांचे म्हणणे आहे.