आर्यन खानसाठी शिवसेनेचे राज्यमंत्री सुप्रीम कोर्टात


मुंबई क्रुझ ड्रग पार्टी प्रकरणात एनसीबीने अटक केलेल्या आर्यन खानच्या अधिकार रक्षणाच्या मागणीसाठी शिवसेना सुप्रीम कोर्टात गेली असून शिवसेनेचे राज्यमंत्री किशोर तिवारी यांनी या संदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. आर्यन खान याचे व्यक्तीस्वातंत्र अधिकार आणि मुंबई अमली प्रदार्थ विरोधी दल म्हणजे एनसीबीची भूमिका याचा तपास केला जावा अशी मागणी या याचिकेत केली गेल्याचे समजते.

या याचिकेत आर्यन खान याच्या व्यक्तीस्वातंत्र अधिकारांचे उल्लंघन एनसीबी कडून गेले जात असल्याचा आरोप केला गेला आहे. या प्रकरणाचा तपास सुप्रीम कोर्टमधील न्यायाधीशांच्या मार्फत केला जावा अशी मागणी करण्यात आली आहे. घटनेच्या अनुच्छेद २२ अंतर्गत किशोर तिवारी यांनी सीजेआय एनव्ही रमण यांनी या याचिकेत सर्वोच्च प्राथमिकता आधारावर हस्तक्षेप करावा अशीही मागणी केली आहे. गेली दोन वर्षी एनसीबी वाईट हेतूने पक्षपाती कारवाया करत असून बॉलीवूड सेलेब्रिटी आणि मॉडेल्सना हैराण करत आहे असे त्यांचे म्हणणे आहे.

आर्यन खान याला अटक करून २० दिवस होत आले तरी जामीन मिळालेला नाही. २० ऑक्टोबर रोजी जामीन अर्जावर सुनावणी होणार होती पण सार्वजनिक सुट्टीचे कारण देऊन ती टाळली गेली हा आरोपीचा अपमान आहे. आर्यनला अवैध प्रकारे १७ रात्री जेल मध्ये डांबण्यात आले आहे आणि हे त्याच्या स्वातंत्र अधिकाराचे उल्लंघन आहे असेही किशोर तिवारी यांचे म्हणणे आहे.

दरम्यान एनसीबी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी सोमवारी जेल मध्येच आर्यन खान याचे स्वतः कौन्सिलिंग केले असून आर्यनने त्यांना तो चांगला नागरिक बनेल असे वचन दिले आहे. वानखेडे यांनी त्याला नशेपासून दूर राहा असा सल्ला दिल्याचेही समजते. वानखेडे सर्वच आरोपींचे कौन्सिलिंग करत असल्याचेही सांगितले जात आहे.