नवी मुंबई ठरले 100 टक्के लसीकरण पुर्ण करणारे पहिले शहर


नवी मुंबई : आपल्या क्षेत्रातील 100 टक्के नागरिकांचे कोरोना लसीकरणाचा पहिला डोस नवी मुंबई महानगरपालिकेने पूर्ण केला आहे. नवी मुंबई महानगरपालिका 100 टक्के लसीकरण करणारी एमएमआर क्षेत्रातील पहिली महानगरपालिका ठरली आहे. तर राज्यातील दुसरी महानगरपालिका ठरली आहे. नवी मुंबई शंभर टक्के लसीकरण पुर्ण करणारे राज्यातील पहिले शहर ठरले आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 18 वर्षांवरील सर्व नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 11 लाख 7 हजार नागरिकांना पहिला डोस देण्यात आला आहे. तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या ५२ टक्के एवढी आहे. ज्या व्यक्तींचा विविध सेवा पुरविताना मोठ्या प्रमाणावर लोकसंपर्क येतो, असे मेडिकल स्टोअर, हॉटेल, सलून, ब्युटी पार्लर, पेट्रोल पम्प, टोल नाका तसेच घरोघरी गॅस वितरण करणारे कर्मचारी, घरकाम करणारे महिला व पुरूष कामगार, ऑटो / टॅक्सी वाहनचालक, सोसायटी वॉचमन अशा कोरोनाच्या दृष्टीने जोखमीच्या व्यक्ती यांचेकरिता विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले होते.

बेघर, निराधार व्यक्ती, तृतीयपंथीय यांचेकरिता तसेच कॉरी क्षेत्र आणि रेडलाईट भागातही विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली. अंथरूणाला खिळलेल्या बेडरिडन व्यक्तींसाठी घरी जाऊन लसीकरण करण्यात आल्यामुळे नवी मुंबई महापालिकेला 100 टक्के लसीकरणाचा टप्पा पार करत आल्याचे महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले आहे.

दरम्यान आतापर्यंत राज्यातील १८ वर्षांवरील 70 टक्के नागरिकांना पहिला डोस देण्यात आला आहे. त्याचबरोबर राज्यातील लसीकरण आणखी वेगात वाढवणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. लसीकरणासाठी मिशन कवच कुंडलचा फायदा झाल्यामुळे मिशन कवच कुंडल भविष्यात आणखी वेगाने राबवणार आहोत. देशाच्या लसीकरणात महाराष्ट्राचे मोठे योगदान असल्याचेही टोपे म्हणाले. दिवाळीनंतर कोरोना वाढू शकतो, तिसऱ्या लाटेचा धोका नसल्याचेही टोपे यांनी स्पष्ट केले आहे.