अश्विन पर्णिमा, कोजागिरी, शरद पौर्णिमा अशा अनेक नावाने साजरी केली जाणारी कोजागिरी मंगळवारी साजरी होत आहे. या दिवसाचे आगळे महत्त्व सांगितले जाते. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ तर असतोच पण तो १६ कलांनी परिपूर्णही असतो. या चंद्रकिरणांतून अमृतवर्षाव होतो असा समज आहे. या दिवशी चंद्राचे तेज सर्वाधिक असतेच पण ते उर्जादायकही असते. याच दिवशी श्रीकृष्णाने राधा व अन्य गोपींसह दिव्य रास खेळला होता असाही समज आहे.
कोजागिरी- चंद्रकिरणातून होतो अमृतवर्षाव
नारद पुराणात असे वर्णन येते की या दिवशी चंद्राच्या शुभ्र प्रकाशात लक्ष्मी तिचे वाहन घुबडावर बसून वरद हातासह पृथ्वी भ्रमण करते. कोण कोण त्यांच्या कर्तव्याप्रती जागृत आहेत याचा शोध ती घेते. म्हणूनच या दिवशी रात्री लक्ष्मीची उपासना केली जाते. या दिवशी आटवलेले दूध पिण्याची प्रथा आहे. दूध आटवून ते चंद्रप्रकाशात ठेवले जाते व पुरेसा चंद्रप्रकाश दुधात पडला की पहाटे ते इष्ट मित्र, नातेवाईकांसह प्राशन केले जाते. चंद्रप्रकाशामुळे हे दूध अमृततुल्य होते व त्याच्या सेवनाने वर्षभर प्रकृती निरोगी राहते असे सांगितले जाते. त्यामुळे कोजागिरी म्हणजे आरेाग्य पर्व असेही मानले जाते.