आपल्या देशाचे चलन रुपया असून १ रूपया पासून २ हजार रुपयापर्यंत मूल्यांच्या नोटा चलनात आहेत. नोटा ही प्रत्येक नागरिकाची रोजची गरज असून कुठेही काही खरेदी करताना नोटा लागतात. त्यामुळे आपण घराबाहेर पडताना नोटा खिशात किंवा पर्स मध्ये घेऊन बाहेर पडतो. या नोटा कशापासून बनतात असे जर विचारले तर बहुतेकांचे उत्तर कागदापासून असेच असते. पण आपल्या चलनी नोटा कागदापासून नाही तर कापसापासून बनविल्या जातात याची माहिती अनेकांना नाही.
कापसापासून बनतात भारतीय चलनी नोटा
रिझर्व बँकेला देशात चलनी नोटा जारी करण्याचा अधिकार आहे आणि रिझर्व्ह बँकेनेच आपल्या नोटा १०० टक्के कापसापासून बनतात असे जाहीर केले आहे. कापसापासून बनलेल्या नोटा दीर्घकाळ टिकतात. कापूस कागदाच्या तुलनेत अधिक मजबूत असतो व त्यामुळे नोटा लवकर फाटत नाहीत हे त्यामागे मुख्य कारण आहे.
या नोटा कापसातील रेषामध्ये असलेल्या लेनिन फायबर, गॅटालीन आणि अधेसिव्ह नावाचे एक द्रावण यांच्या वापरातून बनविल्या जातात. यामुळे नोटेचे आयुष्य वाढते. केवळ भारत नव्हे तर अन्य अनेक देशात सुद्धा नोटा बनविण्यासाठी कापसाचा वापर केला जातो. भारतीय नोटांच्या मध्ये सर्वाधिक सुरक्षा फिचर्स आहेत. त्यामुळे नकली नोटा छपाई वर नियंत्रण राहते. भारतीय नोटांच्या डिझाईन मध्ये सुद्धा वेळोवेळी बदल केला जातो. केंद्र सरकार, आर्थिक तज्ञ आणि रिझर्व बँक एक वर्षात साधारण किती मूल्याचा नोटा लागणार याचा अंदाज घेऊन त्यानुसार किती नोटा चलनात आणायच्या याचा निर्णय घेते. दीर्घ काळ वापरून फाटलेल्या, तुटलेल्या नोटा नष्ट केल्या जातात मात्र चांगल्या अवस्थेतील नोटा पुन्हा चलनात आणल्या जातात.