‘ईद-ए-मिलाद’ निमित्त राज्यपाल व उपमुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा


मुंबई : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी ‘ईद ए मिलाद’ निमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचा जन्मदिवस असलेला ईद-ए-मिलाद हा सण त्यांच्या मानवतावादी कार्याचे तसेच परोपकाराच्या शिकवणीचे स्मरण करुन देतो. ईद ए मिलादच्या मंगल पर्वावर मी राज्यातील सर्व लोकांना, विशेषतः मुस्लिम बंधु – भगिनींना मनःपूर्वक शुभेच्छा देतो, असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ‘ईद-ए-मिलाद’च्या सर्वांना शुभेच्छा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘ईद-ए-मिलाद’च्या राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या असून ‘ईद’च्या निमित्ताने समाजातील गरजू, गरीब बांधवांना आपल्या आनंदात सहभागी करुन घेण्याचे आवाहन केले आहे. मोहम्मद पैगंबर यांचा प्रेम, दया, शांती, त्यागाचा संदेश मानवतेच्या कल्याणासाठी सर्वांना प्रेरीत करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

‘ईद’च्या निमित्त दिलेल्या संदेशात उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात की, मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्ताने साजरा होत असलेला ‘ईद-ए-मिलाद’चा सण हा समाजात मोहम्मद पैगंबर यांचा एकता, समता, बंधुता, सौहार्दाचे संदेश घेऊन जाईल. मानवतेच्या कल्याणासाठी सर्वांना प्रेरीत करील. यंदा कोरोनाचे संकट कमी होत असले तरी, ‘ईद-ए-मिलाद’चा सण सर्वांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत, स्वत:ची, कुटुंबाची, समाजाच्या सुरक्षिततेची काळजी घेत साजरा करावा, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.