उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून ४० टक्के महिला उमेदवार; प्रियंका गांधींची घोषणा


लखनऊ – सर्वच राजकीय पक्षांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केली असून काँग्रेसकडून प्रियंका गांधी रिंगणात आहेत. प्रियंका गांधी यांनी या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश मधील महिलांना राजकारणात येण्यासाठी आवाहन केले आहे. तसेच ४० टक्के तिकीट महिलांना उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत देणार असल्याची घोषणा प्रियंका गांधी यांनी केली. लखनऊ येथे आयोजित पत्रकार परिषदेत आज त्या बोलत होत्या. देश आणि उत्तर प्रदेशच्या महिलांना ही पत्रकार परिषद समर्पित असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. ‘लड़की हूँ लड सकती हूँ’ हा नारा यावेळी त्यांनी दिला.

यावेळी काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी म्हणाल्या की, आम्ही ४० टक्के तिकिटे महिलांना येत्या उत्तर प्रदेश निवडणुकीत देऊ. हा निर्णय त्या सर्व महिलांसाठी आहे, ज्यांना उत्तर प्रदेशात बदल हवा आहे, राज्याची प्रगती हवी आहे. महिला राजकारणात पूर्ण सहभागी होतील. प्रियंका गांधी पुढे म्हणाल्या की, जातीच्या आधारावर नाही तर पात्रतेच्या आधारावर महिलांना तिकीट दिले जाईल. आम्हाला उमेदवार मिळतील, आम्हीही लढू.

तुम्ही जर या वेळी मजबूत नसला तर पुढच्या वेळी तुम्ही मजबूत व्हाल. २०२४ मध्ये यापेक्षा जास्त महिलांना संधी मिळू शकते. माझ्या हातात असते, तर ५० टक्के तिकीट महिलांना दिले असते. यामागे मुख्य कारण म्हणजे ज्या महिला एकत्रितपणे एक शक्ती बनून लढत नाहीत. त्या महिलांना जाती धर्मात विभागले जात असल्यामुळे हा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशमधील बदलाचे स्वप्न पूर्ण होईल. देशाला विकासाच्या दिशेने पुढे न्यायचे आहे. सहभागी होण्यासाठी महिलांनी पुढे यावे. महिलांनी स्वतःचे रक्षण करावे. माझा निर्णय उत्तर प्रदेशच्या प्रत्येक महिलेसाठी असल्याचे प्रियंका गांधी म्हणाल्या. तसेच त्या लोकांसाठी मी लढत आहे, जे आवाज उठवू शकत नाहीत. आवाज उठवणाऱ्यांना चिरडले जात आहे. माझे राजकारण परिस्थिती बदलणे हे लक्ष आहे. उत्तर प्रदेशात हत्या आणि चिरडण्याचे आज राजकारण होत असल्याचे त्या म्हणाल्या.