टी-20 विश्वचषक : आयर्लंडच्या गोलंदाजाने रचला इतिहास, 4 चेंडूत बाद केले 4 गडी


अबु धाबी : रविवारपासून टी-20 विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली आहे. स्पर्धेच्या दुसऱ्याच दिवशी ऐतिहासिक कामगिरीची नोंद झाली आहे. नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात आयर्लंडच्या कुर्तीस कॅम्फरने 4 चेंडूत 4 गडी बाद केले आहेत. सामन्याच्या 10 व्या षटकात कुर्तीसने नेदरलँड्सच्या 4 फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. 10 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर कुर्तीसने ऍकरमनला 11 धावांवर बाद केल्यानंतर पुढच्या चेंडूवर रेयान टेनडसकाटे शून्य धावांवर पायचीत झाला. स्कॉट एडवर्ड्सलाही पायचीत करत कुर्तीसने या टी-20 विश्वचषक स्पर्धेमधील पहिली हॅट्रिक पूर्ण केली.

10 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर रुलॉफ व्हेन्डरमरवा त्रिफळाचीत झाला आणि कुर्तीसच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद झाली. टी-20 इतिहासामध्ये चार चेंडूत चार गडी बाद करणारा कुर्तीस कॅम्फर तिसरा गोलंदाज ठरला आहे. याआधी अफगाणिस्तानचा राशिद खान आणि श्रीलंकेच्या लसिथ मलिंगाने हा विक्रम केला होता. मलिंगाच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्येही अशाच विक्रमाची नोंद आहे.

मलिंगाने 2007 विश्वचषक स्पर्धेमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लागोपाठ 4 चेंडूवर 4 गडी बाद केले होते. याआधी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी मोठा उलटफेर पाहायला मिळाला. स्कॉटलंडच्या टीमने कागदावर बलाढ्य वाटणाऱ्या बांगलादेशचा 6 धावांनी पराभव केला.