टी-२० विश्वचषक : जाएंट किलर बांग्लादेशचा स्कॉटलंडकडून पराभव


ओमान – टी-२० विश्वचषकाच्या पहिल्याच दिवशी जाएंट किलर अर्थात मोठ्या संघांना पराभवाचा धक्का देणारा संघ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बांगलादेशला स्कॉटलंडने दणका दिला असून बांगलादेशला आपल्या पहिल्याच सामन्यात पराभवाचे तोंड पहावे लागले आहे. बांगलादेशला नवख्या स्कॉटलंडच्या संघाने सहा धावांनी पराभूत केल्यामुळे या स्पर्धेतील बांगलादेशचे भविष्य काय असेल याबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. हा पराभव बांगलादेशला फार महागात पडू शकतो. या पराभवामुळे बांगलादेशवर स्पर्धेबाहेर फेकले जाण्याची वेळ येऊ शकते.

बांगलादेशने ओमानमधील अल एमिरेट्समध्ये झालेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. स्कॉटलंडने २० षटकांमध्ये ९ गड्यांच्या मोबदल्यात १४० धावा केल्या. धावांचा पाठलाग करताना बांगलादेशला निर्धारित षटकांमध्ये ७ गड्यांच्या मोबदल्यात १३४ धावांपर्यंतच मजल मारता आली. स्कॉटलंडच्या ख्रिस ग्रीव्ह्सने २८ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ४५ धावा केल्या. त्याने मार्क वॅट (२२) सोबत सातव्या विकेटसाठी ५१ धावांची भागीदारी केली. बांगलादेशकडून मेहदी हसनने ३ तर शाकिब अल हसन आणि मुस्तफिजुर रहमानने प्रत्येकी २ बळी घेतले.

बांगलादेशची धावांचा पाठलाग करताना सुरुवात खराब झाली. लिटन दास आणि सौम्या सरकार हे त्यांचे दोन्ही सलामीवीर वैयक्तिक आणि प्रत्येकी ५ धावांची भर घालून तंबूत परतले. त्यानंतर मुशफिकूर रहिमने (३८) संघाचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण धावगती वाढवण्यात तो अपयशी ठरला. कप्तान महमूदुल्लाह खेळपट्टीवर असेपर्यंत बांगलादेशला विजयाची आशा होती. पण १९व्या षटकात व्हीलने त्याला बाद करत स्कॉटलंडचा विजय निश्चित केला. स्कॉटलंड़कडून व्हीलने ३ तर ग्रीव्ह्जने २ बळी घेतले.

पहिल्या फेरीतील दोन सामन्यानंतर टी-२० विश्वचषक स्पर्धा यंदा फारच रोमांचक होणार असल्याची चिन्हं दिसत आहेत. नवख्या स्कॉटलंडकडून पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने बांगलादेशला मोठा धक्का बसला आहे. सध्या पहिल्या सामन्यानंतर स्कॉटलंड आणि ओमान यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. तर दुसरीकडे बांगलादेशचा संघ या पराभवामुळे पात्र होणार की नाही याबद्दलच अजून चिंतेत असल्याचे दिसत आहे. आता सुपर १२ म्हणजेच अंतिम १२ संघांमध्ये पोहचून मुख्य स्पर्धा खेळण्यासाठी बांगलादेशला पूर्ण ताकद लावावी लागणार आहे. स्कॉटलंडने दिला तसाच आणखीन एखादा धक्का बांगलादेशला मिळाला तर अंतिम १२ मध्ये खेळण्याचे त्यांचे स्वप्न भंग होईल.

आठ संघ टी २० विश्वचषकाच्या पहिल्या फेरीमध्ये खेळत आहेत. या आठ संघांना प्रत्येकी चार नुसार दोन गटांमध्ये वाटण्यात आले आहे. प्रत्येक गटातून दोन संघांना अंतिम १२ मध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. दोन्ही गटांमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी राहणारे संघ पात्र ठरतील. बांगलादेश ब गटामध्ये आहे.

एक सामना बांगलादेशचा झाला असून अजून दोन सामने बाकी आहेत. १९ ऑक्टोबर रोजी बांगलादेशचा सामना यजमान ओमानसोबत होणार आहे. त्यानंतर बांगलादेश पापुआ न्यू गिनीविरुद्ध २१ ऑक्टोबर रोजी मैदानात उतरले. या दोन्ही सामन्यांमध्ये आता बांगलादेशला केवळ विजय मिळवणे पुरेसे नसणार तर त्यांना मोठ्या फरकाने हे सामने जिंकावे लागणार आहेत. ओमानच्या संघाने पापुआ न्यू गिनीला १० गडी राखून पराभूत केल्यामुळे त्यांची अंतिम १२ मधील दावेदारी अधिक पक्की झाली आहे.

म्हणूनच बांगलादेशला आता पुढील सामने जपून खेळावे लागणार आहेत. सध्या ब गटात ओमान पहिल्या क्रमांकावर, स्कॉटलंड दुसऱ्या तर बांगलादेश तिसऱ्या आणि पापुआ न्यू गिनी चौथ्या स्थानी आहे. मागील काही कालावधीमधील कामगिरीनंतर बांगलादेशचा संघ हा भारत आणि पाकिस्तानपेक्षा सरस असल्याचा दावा बांगलादेशी चाहते करत असल्याचे सोशल मीडियावर दिसून आले होते. पण या स्पर्धेतील पहिल्याच सामन्यातील पराभावामुळे बांगलादेशी चाहत्यांचाही मोठा अपेक्षाभंग झाला आहे.