ईडी, सीबीआय, एनसीबीसोबत किरीट सोमय्यांनाही सीमेवर पाठवा, दहशतवाद्यांचे पेपर आम्ही त्यांना देतो : संजय राऊत


मुंबई : काश्मीरमधील परिस्थिती, राज्यात केंद्रीय संस्थाच्या कारवायांवरुन भाजपवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. संजय राऊतांनी म्हटले की, काश्मिरी पंडितांना कधी मारले जात आहे. केंद्र सरकार गृह मंत्रालयाची ही ही जबाबदारी आहे. हाताबाहेर काश्मीरची परिस्थिती गेली आहे, एवढेच मी सांगू शकतो. सीमेवर ईडी, सीबीआय, एनसीबीला पाठवा, हे फार पावरफुल लोक आहेत. त्यांच्यासोबत किरीट सोमय्यांनाही पाठवा, आम्ही दहशतवाद्यांचे पेपर देतो, अशा शब्दात संजय राऊत यांनी टीका केली आहे.

संजय राऊत यांनी पुढे म्हटले आहे की, हाताबाहेर काश्मीरची परिस्थिती गेली आहे. तिथे दहशतवाद पुन्हा सुरू झाला आहे. सरसंघचालक बोलले ते योग्यच आहे. 370 कलम हटवूनही काही फरक पडलेला नाही. रोज लोके मारली जात आहेत. ही गृहमंत्रालयाची जबाबदारी आहे. केवळ पाकिस्तान नाही तर चीनवर पण सर्जिकल स्ट्राईक करा. चीनपण लडाख, तवांगमध्ये घुसखोरी करत असल्याचे राऊत म्हणाले. पाकिस्तानसोबत कसे संबंध प्रस्तापित करायचे याचा निर्णय सरकारला एकदा घेऊद्या मग आम्ही बोलू. तुम्ही तुमच्या मतलबाप्रमाणे राजकीय सोयीच्या भूमिका घेता आणि काश्मिरची जनता रोज तिथे मरते आहे. हे चालणार नसल्याचे ते म्हणाले.

राऊत म्हणाले की, काश्मीरची परिस्थिती क्रिकेट खेळून, बंद करून बदलणार आहे का? पाकिस्तानसोबत कोणतेच संबंध ठेवू नका. तुम्ही तिकडे जाऊन केक कापता, असा टोलाही त्यांनी लगावला. पुढे ते म्हणाले की, काश्मीरमधील परिस्थिती कधी समोर येऊच दिली नाही, तिथे अनेक निर्बंध होते. गृहमंत्र्यांनी समोर येऊन परिस्थिती स्पष्ट करायला हवी. तसेच शरद पवारांवर ज्या भाषेत चंद्रकांत पाटलांनी टीका केली आहे, त्यांची लायकी आहे का?, कुठे हिमालय आणि कुठे टेंगूळ. माझे महाविकास आघाडीतील सर्व मंत्र्यांना आवाहन आहे की, गप्प बसू नका. महाविकास आघाडीतील नेत्यांनी नुसते खुर्च्यांवर बसू नये. टीकेला प्रति टीका करा, हे सारे बंद होईल, असे ते म्हणाले.