मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अयोध्येच्या साध्वी गुरु माँ कांचनगिरी यांनी भेट घेतली. त्यांच्यासोबत यावेळी सूर्याचार्यजी देखील उपस्थित होते. महापालिका निवडणुकीआधी मनसेची हिंदुत्वाच्या मुद्द्याकडे या भेटीमुळे वाटचाल सुरु असल्याची चर्चा सुरु झाली आहे. गुरु मॉं कांचनगिरी यांनी राज ठाकरेंच्या भेटीआधी शिवाजी पार्क येथे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृती स्थळावर जाऊन आदरांजली वाहिली. गुरु माँ कांचनगिरी यांनी राज ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधत राज ठाकरेंसोबतच्या भेटीचा हेतू स्पष्ट केला. तसेच त्यांनी मनसेने हिंदुत्वाच्या मुद्यावर विचारधारा जमत असेल तर भाजपसोबत जावे, असेही म्हटले आहे.
मनसेने हिंदुत्वाच्या मुद्यावर विचारधारा जमत असेल तर भाजपसोबत जावे : कांचनगिरी
गुरू माँ कांचनगिरी राज ठाकरेंच्या भेटीनंतर बोलताना म्हणाल्या की, आज आमची राज ठाकरेंसोबत हिंदू राष्ट्र बाबत चर्चा झाली. उत्तर भारतीयांच्या मुद्यावर सुद्धा चर्चा झाली. जे उत्तर भारतीयांबाबत राज ठाकरे यांच्या मनात होते, त्याबाबत मी त्यांना बोलले. राज ठाकरेंचे उत्तर भारतीयांवर प्रेम आहे. गुरु माँ कांचनगिरी यांनी पुढे बोलताना राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबतही वक्तव्य केले. त्या म्हणाल्या की, डिसेंबरमध्ये अयोध्या दौऱ्यावर जाण्याचा विचार राज ठाकरे यांनी केला आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमधून मुंबईत आलेल्यांनी निश्चिंत राहावे. कारण राज ठाकरे यांचे उत्तर भारतीयांवरील प्रेम त्यांच्यासोबत चर्चा करताना मला दिसले.
राष्ट्रासाठी मी काम केले आहे, राजकारणाबाबत मला माहित नाही. हिंदुत्वाच्या मुद्यावर विचारधारा जर जमत असेल तर मनसेने भाजपसोबत जायला हवे. नवे हिंदुत्व जन्माला येत आहे आणि हे नवे हिंदुत्व ब्रिटीशांपेक्षाही भारी पडेल, असेही गुरू माँ कांचनगिरी बोलताना म्हणाल्या. अयोध्येत राज ठाकरे यांचे मोठे स्वागत केले जाईल. सगळे त्यांच्यासोबत असल्याचा विश्वास गुरु माँ कांचनगिरी यांनी व्यक्त केला.
काश्मीरमध्ये मागील काही दिवसांपासून दहशतवाद्यांसोबत भारतीय जवानांची चकमक सुरु आहे. या चकमकीत आतापर्यंत 9 जवानांना वीरमरण आले आहे. याबाबत विचारले असता गुरु माँ कांचनगिरी म्हणाल्या की, ज्या गोष्टी काश्मीमध्ये आधीपासून होत आहेत, काश्मीर जळत आहे ते नेहरू आणि गांधी यांनी जी फाळणी केली त्यामुळे होत आहे.