जिनोम सिक्वेन्सिंगमुळे मुंबईत डेल्टा व्हेरीएंट जवळपास निष्प्रभ


मुंबई : आर्थिक राजधानी मुंबईत कोरोनाचा प्रवेश झाल्यानंतर पहिल्या लाटेतील सुरुवातीचे काही दिवस वगळता दीर्घकालानंतर काल मुंबईत प्रथमच कोरोनाची झीरो डेथ फीगर आली आहे. मोठा दिलासा देणाऱ्या या बातमीसह आणखी एक चांगली बातमी समोर आली आहे. जीनोम सिक्वेसिंगसंदर्भातील ती आहे. जिनोम सिक्वेन्सिंगमध्ये लसीकरणाचा फायदा होत असल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. 50 टक्के डेल्टा व्हेरीएंट असूनही गंभीर रुग्णाचे प्रमाण कमी आहे. मुंबईतील डेल्टा व्हेरीएंट जवळपास निष्प्रभ होत असल्याचे समोर आले आहे.

महानगरपालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात नेक्स्ट जनरेशन जिनोम सिक्वेसिंग करणारी वैद्यकीय यंत्रणा कार्यान्वित आहे. आजवर दोन तुकड्यांमध्ये या यंत्रणेने चाचण्या केल्यानंतर आता तिसऱ्या तुकडीतील चाचणीचे निष्कर्ष जाहीर करण्यात आले. तिसऱ्या तुकडीमध्ये एकूण 343 रुग्णांमधील कोरोना नमुन्यांचा अभ्यास करण्यात आला. यात ‘डेल्टा व्हेरिअंट’चे 54 टक्के, ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ चे 34 टक्के तर इतर प्रकारांचे 12 टक्के रुग्ण आढळले आहेत. कोरोना लसीकरणाचा प्रभाव म्हणून साथ पूर्णपणे नियंत्रणात असल्याचे या निष्कर्षांवरुन आढळत असल्यामुळे सर्व पात्र नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे, त्याचबरोबर कोरोना नियमावलीचे कठोरपणे पालन करणे आवश्यक आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

निष्कर्षानुसार, 343 पैकी 185 रुग्ण (54 टक्के) हे ‘डेल्टा व्हेरिअंट’ तर 117 रुग्ण (34 टक्के) हे ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ प्रकारातील कोरोनाबाधित असल्याचे स्पष्ट झाले आहे. उर्वरित नमुन्यांमध्ये इतर प्रकारांचे 40 कोरोनाबाधित रुग्ण (12 टक्के) असल्याचे निदर्शनास आले आहे. डेल्टा व्हेरिअंट आणि डेल्टा डेरिव्हेटीव्ह या दोन्ही प्रकारातील कोरोना तुलनेने सौम्य त्रासदायक असून त्यापासून तितकासा गंभीर धोका संभवत नाही. डेल्टा व्हेरिअंट समवेत तुलना केल्यास, डेल्टा डेरिव्हेटीव्ह आणि इतर प्रकाराचे विषाणू यांचा संक्रमण / प्रसार वेग देखील कमी असल्याचे आढळले आहे. पण असे असले तरी, कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर वेळीच व योग्य वैद्यकीय उपचार घेणे आवश्यक आहे.

विशेष म्हणज कोरोना लसीकरण हा निकष विचारात घेतल्यास, पहिला डोस घेतलेल्या 54 नागरिकांना कोविडची लागण झाली असली तरी फक्त 7 जणांनाच रुग्णालयात दाखल करावे लागले. 54 पैकी एकाही नागरिकाला प्राणवायू पुरवठा, अतिदक्षता उपचार यांची गरज भासली नाही. तसेच यातील कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. दोन्ही डोस घेतलेल्या 168 नागरिकांना कोरोनाची लागण झाली, असली तरी त्यापैकी फक्त 46 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यातही अवघ्या 7 जणांना अतिदक्षता उपचारांची गरज भासली. पण कोणाचाही मृत्यू ओढवला नाही, ही बाब नमूद घेण्याजोगी आहे.

तर, लसीचा एकही डोस न घेतलेल्या 121 नागरिकांना कोरोनाची लागण झाली. त्यातील 57 जणांना रुग्णालयात दाखल करावे लागले. तर एका रुग्णास प्राणवायू पुरवठा, एकास अतिदक्षता उपचार पुरवावे लागले. तर तीन जणांचा मृत्यू ओढवला आहे. मृत्यू ओढवलेले तिघेही रुग्ण वयोवृद्ध तसेच मधुमेह व अति उच्च रक्तदाब ग्रस्त होते. यातील दोघांना ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ तर एकास ‘डेल्टा व्हेरिअंट’ ची लागण झालेली होती. पण, या तिन्ही रुग्णांनी कोरोना लागण झाल्याचे निष्पन्न होऊनही रुग्णालयात दाखल होण्यास विलंब केल्यामुळे त्यांच्या जीवावर बेतले. याचाच अर्थ, कोरोना प्रतिबंधक लस घेणाऱ्यांना व कोरोना प्रतिबंधक नियम पाळणाऱ्यांना कोरोनाची लागण होण्यापासून संरक्षण मिळते, तसेच बाधा झाली तरी त्याची तीव्रता रोखता येते, असे म्हणण्यास पुरेसा वाव आहे.

जर १८ पेक्षा कमी असलेला वयोगट विचारात घेतला तर, एकूण 343 रुग्णांपैकी 29 जण (8 टक्के) या वयोगटात मोडतात. पैकी 11 जणांना ‘डेल्टा व्हेरिअंट’, 15 जणांना ‘डेल्टा डेरिव्हेटीव्ह’ आणि 3 जणांना इतर प्रकाराच्या कोरोनाची लागण झाल्याचे आढळले. याचाच अर्थ, तुलनेने बालक व लहान मुलांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण संपूर्णपणे नियंत्रणात आहे. हे निष्कर्ष पाहता सर्व पात्र नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे. तसेच कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे देखील कठोर पालन प्रत्येकाने करण्याची आवश्यकता असल्यामुळे नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घ्यावेत. मास्कचा योग्य उपयोग करावा. सार्वजनिक स्थळी सुरक्षित अंतर राखावे. गर्दी टाळावी. हातांची नियमित स्वच्छता राखावी. या सर्व बाबी प्रत्येकाने पाळाव्यात, असे आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.