एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यासारख्या नेत्यांना भाजपने घरी बसवले


मुंबई – एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे यासारख्या नेत्यांना भाजपने घरी बसवले. त्यांनी पक्षासाठी केलेल्या कामाचाही विचार केला नाही. अनेकांना तिकीट देऊन मोठमोठ्या पदापर्यंत पोहचवले. पण त्यांना साधे पक्षाचे तिकीटही मिळू दिले नाही, हे दुर्दैव आहे. प्रतिस्पर्धी ठरू नयेत यासाठी आपल्याच सहकाऱ्यांचा बळी घेतला गेल्याच्या चर्चा ऐकायला मिळतात, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

दोन दिवसांपूर्वी सांगली येथील एका कार्यक्रमात बोलताना, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याचे समोर आले आहे. चंद्रकांत पाटलांकडून करण्यात आलेल्या या वक्तव्यावरून आता राजकीय वर्तुळात घमासान सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी फेसबूक पोस्ट करत भाजपवर हल्लाबोल केला आहे.

रोहित पवार आपल्या फेसबूक पोस्टमध्ये म्हतात…,अपेक्षाभंग झाला की दुःख होणं साहजिकच असतं आणि ते दुःख, ती सल कायम मनाला हतबल करते आणि ही हतबलता सहन न झाल्यास काहीजण मग तोल ढळल्यासारखं बडबडतात… असंच काहीसं भाजपच्या नेत्यांच्या बाबतीत होताना दिसतंय. जे पन्नासहून अधिक वर्षे संसदीय राजकारणात काम करत आहेत त्या आदरणीय पवार साहेबांबत भाजपचे काही स्वयंघोषित वरिष्ठ नेते एकेरी उल्लेख करू लागले यात त्यांची चूक नाही, तर हे सत्ता जाण्याचं दुःख आहे आणि ते समजू शकतो, परंतु या पातळीपर्यंत दुःख होईल ही अपेक्षा नव्हती. स्व. प्रमोद महाजन, स्व. मुंडे साहेब, स्व. वाजपेयी साहेब यांच्यासह अडवाणी जी यांनी हयातभर विरोधी पक्षात राजकारण केलं, मात्र त्यांचा तोल कधी ढळला नाही. महाराष्ट्रात मात्र काहींना सत्तेचा दुरावा सहन होत नसल्यामुळे असं होत असावं.

मुख्यमंत्री साहेबांच्या भाषणाचे विरोधी पक्ष नेत्यांनी काढलेले अर्थ, पत्रकार परिषदेत त्यांची देहबोली आणि गमावलेला आत्मविश्वास सर्व काही सांगून जात होता. भारतीय जनता पक्षाने बंगालमध्ये साम-दाम-दंड-भेद हे सर्वकाही वापरून बघितलं, परंतु बंगाली अस्मितेसमोर ते टिकाव धरू शकले नाहीत, बंगालच्या जनतेने भाजपला घरचा रस्ता दाखवला. महाराष्ट्रातही भाजपकडून असेच सगळे मार्ग वापरून बघितले जात आहेत. याच संदर्भाने मुख्यमंत्री साहेब बोलले. आपल्याच चुकीमुळे आपल्या राज्याच्या हक्काचे जीएसटीचे पैसे बुडत असताना, मुंबईचं आर्थिक महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला जात असताना, महाराष्ट्राचं पाणी गुजरातला पळवलं जात असताना आजवर केवळ बघ्याची भूमिका घेण्यात आली. अशा नेत्यांना मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या मराठी अस्मितेच्या संदर्भाचा अर्थ तरी कसा कळेल?

केंद्रात भाजप सत्तेत आल्यापासून बिगरभाजपशासित राज्यांची मुस्कटदाबी केली जात आहेच पण कृषी, उर्जा, धरणे, आर्थिक अधिकार याचंही केंद्रीकरण केलं जात आहे. मुख्यमंत्र्यांनी नेमकं याच मुद्द्यांवर बोट ठेवलं. शेजारच्या राज्याला वादळात मदत करण्यासाठी तातडीने एक हजार कोटी रुपये मिळतात. आपल्या राज्याला मात्र एक कवडीही दिली जात नाही. स्वतःची तिजोरी भरण्यासाठी राज्यांना मिळणारे कर कमी करून सेस वाढवले जातात. ही कोणती संघराज्य पद्धती? या नेत्यांनी एकदा संविधानात डोकावून बघितलं तर त्यांना संघराज्य पद्धतीचा अर्थ नक्कीच समजेल.

भाजपाने खडसे साहेब, पंकजाताई, विनोदजी तावडे, बावनकुळे साहेब यासारख्या नेत्यांना घरी बसवलं. पक्षासाठी त्यांनी केलेल्या कामाचाही विचार केला नाही. अनेकांना तिकिटं देऊन मोठमोठ्या पदांपर्यंत पोहचवलं. पण त्यांना साधं पक्षाचं तिकीटही मिळू दिलं नाही, हे दुर्दैव आहे. प्रतिस्पर्धी ठरू नयेत यासाठी आपल्याच सहकाऱ्यांचा बळी घेतला गेल्याच्या चर्चा ऐकायला मिळतात. किती काळ सत्तेत राहिलात यापेक्षा सत्तेत असताना लोकांसाठी काय केलं हे महत्त्वाचं असतं.

आपला पक्ष टिकवण्यासाठी महाविकास आघाडी सरकार पडून आपण सत्तेत येण्याची स्वप्न दाखवली जातात, पण आता भाजपमधलीच मंडळी या ‘पुन्हा येण्याला’ कंटाळलीय. तसंच ‘सरकार पडणार की नाही यातून बाहेर पडा’ हा काही दिवसांपूर्वी तुमच्याच पक्षाच्या नेत्यांनी दिलेला सल्ला जरुर विचारात घ्या आणि चांगल्या भावनेने लोकांसाठी, राज्याच्या हितासाठी काम करा, असं केलं तर तुम्हाला नक्कीच शांतता लाभेल.