माजी लष्कर अधिकाऱ्याने दाखवली अक्षयच्या ‘गोरखा’ चित्रपटाच्या पोस्टरमधील गंभीर चूक


बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार ‘अतरंगी रे’ आणि ‘रक्षाबंधन’ पाठोपाठ आता आणखी एक नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘गोरखा’ असे या चित्रपटाचे नाव असून चित्रपटाची निर्मिती आनंद एल राय करत आहेत. या चित्रपटाचा फर्स्ट लूक नुकताच रिलीज करण्यात आला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे. पण या पोस्टरमध्ये माजी लष्कर अधिकारी मेजर माणिक एम जोली यांनी एक चूक सांगितली आहे. ही चूक गंभीर असून याप्रकरणी लक्ष द्यावे, असा सल्लाही त्यांनी अक्षयला दिला आहे. विशेष म्हणजे यावर अक्षयनेही प्रतिक्रिया देत यापुढे मी काळजी घेईन, असे सांगितले आहे.


नुकताच सोशल मीडियावर अक्षय कुमारने गोरखा चित्रपटातील फर्स्ट लूक शेअर केला आहे. त्याने हे पोस्टर शेअर करत, कधी कधी तुमच्या समोर अशा कथा येतात, ज्या तुम्हाला प्रेरणादायी वाटतात. त्यावर काम करण्याची तुमची इच्छा होते, असे लिहिले आहे. अक्षयच्या आगामी चित्रपटातील हे पोस्टर गोरखा रायफल रेजिमेंटचे अधिकारी मेजर माणिक एम जोली यांनी त्यांच्या ट्विटरवर शेअर केले आहे. हे पोस्टर शेअर करतेवेळी त्यांनी एक गंभीर चूक सर्वांच्या नजरेस आणून दिली.


मेजर माणिक एम जोली म्हणतात, प्रिय अक्षय कुमार, मी एक माजी गोरखा अधिकारी असल्यामुळे या चित्रपटाची तुम्ही निर्मिती केल्याबद्दल मी सर्वप्रथम तुमचे आभार मानतो. पण एक महत्त्वाची माहिती तुम्हाला द्यायची आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमधील कुकरी ही व्यवस्थित दाखवावी. कुकरी हे एक धारदार शस्त्र असून त्याची धार ही आतील बाजूला असते. ही तलवार नाही तर कुकरी आहे, जिचा वार आतील बाजूने होतो. मी यासाठी तुम्हाला कुकरीचा एक फोटोही पाठवत आहे. धन्यवाद, असे ट्वीट त्यांनी केले.


अक्षय कुमारने मेजर माणिक एम जोली यांनी ही चूक दाखवल्यानंतर तातडीने त्यांना प्रतिक्रिया दिली. आदरणीय, मेजर जोली जी, तुम्ही ही चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. या चित्रपटाचे चित्रिकरण करतेवेळी आम्ही याची काळजी घेऊ. ‘गोरखा’ हा चित्रपट बनवताना मला खूप अभिमान वाटत आहे. या चित्रपटातून खरे वास्तव लोकांच्या समोर आणण्यासाठी कोणत्याही सूचनांचे स्वागत केले जाईल, अशी प्रतिक्रिया अक्षयने दिली.

‘गोरखा’ हा चित्रपट भारतीय लष्कराच्या गोरखा रेजिमेंटच्या पाचव्या गोरखा रायफल्सचे अनुभवी अधिकारी मेजर जनरल इयान कार्डोझो यांच्या जीवनावर आधारित आहे.. कार्डोजो यांनी १९६२, १९६५ साली झालेले युद्ध आणि १९७१ साली भारत-पाकिस्तान युद्धात कामगिरी बजावली होती.