आयकर विभागाची काँग्रेससाठी काम करणाऱ्या कंपनीवर छापेमारी; बेहिशेबी मालमत्ता आणि कागदपत्रे जप्त


नवी दिल्ली – आयकर विभागाने काँग्रेस पक्षाशी संबंधित एका कंपनीवर छापेमारी केली आहे. या छापेमारीत बेहिशेबी मालमत्ता सापडल्याचे आयकर विभागाने म्हटले आहे. आयकर विभागाने आसाम आणि इतर राज्यांमध्ये काँग्रेस पक्षासाठी निवडणूक व्यवस्थापन आणि डिजिटल मार्केटींग करणाऱ्या डिझाईन बॉक्स्ड या कंपनीवर छापा टाकला. आयकर अधिकाऱ्यांनी कंपनीच्या चंदीगड, मोहाली, सुरत आणि बंगळुरू येथे एकूण सात ठिकाणी शोधमोहीम राबवली. याशिवाय कंपनीच्या एमडीच्या हॉटेल रूमचीही झडती घेण्यात आली आहे.

आयकर विभागाने जारी केलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, अनेक संशयास्पद कागदपत्रे छाप्यादरम्यान जप्त करण्यात आली आहेत, ज्यात बेहिशेबी उत्पन्नाचे आणि मालमत्तेचे हस्तांतरणाचे पुरावे आहेत. आयकर विभागाच्या म्हणण्यानुसार, कंपनी एंट्री ऑपरेटरद्वारे अकॉमोडेशन संदर्भातील नोंदणी करत होती. हवालाच्या माध्यमातून व्यवसाय केल्याचा आरोपही कंपनीवर करण्यात आला आहे.

कर चुकवण्याच्या उद्देशाने कंपनीने महसूल कमी नोंदवला आहे आणि जाणीवपूर्वक खर्च वाढवला आहे. हा समूह बेहिशेबी रोख देयकांमध्येही सहभागी असल्याचे आढळून आले आहे. विभागाच्या मते, छाप्यांमधून मिळालेल्या कागदपत्रांमध्ये असेही आढळून आले आहे की कंपनीच्या संचालकांचा वैयक्तिक खर्च देखील कंपनीचा व्यवसायिक खर्च म्हणून नोंदवला गेला आहे. तसेच संचालक आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या वापरासाठी कंपनीच्या कर्मचारी आणि प्रवेशकांच्या नावावर आलिशान वाहने खरेदी केल्याचेही आयकर विभागाने म्हटले आहे. या कंपनीवर १२ ऑक्टोबर रोजी छापा टाकण्यात आला होता.