दीक्षाभूमीवर स्वयंसुरक्षेसाठी कोरोना प्रोटोकॉलचे पालन करा : डॉ. नितीन राऊत


नागपूर : महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या अधिक असल्यामुळे निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामुळेच यावर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा टाळण्यात आला होता. तथापि, दोन डोस घेतलेल्या अनुयायांना सध्या दीक्षाभूमीवर दर्शनासाठी प्रवेश दिला जात आहे. दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांचे स्वागत आहे. मात्र, त्यांनी स्वतःच्या जीविताच्या रक्षणासाठी कोविड प्रोटोकॉलचे पालन करावे, प्रशासनाला शिस्त राखण्यासाठी मदत करावी, असे आवाहन राज्याचे ऊर्जा मंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले आहे.

गुरुवारी धम्मचक्र प्रवर्तन दिनाला त्यांनी दीक्षाभूमीवर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थिला अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, या वर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा नाही याबाबत संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला आहे. मात्र सलग दुसर्‍या वर्षीही हा सोहळा होत नसल्यामुळे अनेक अनुयायी दीक्षाभूमीवर येण्याची शक्यता आहे. तथापि, कोरोनाच्या सावटात आलेल्या या सोहळ्याला स्वयंसुरक्षेसाठी कोविड प्रोटोकॉल पाळावा, गर्दी टाळावी, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांना शक्यतो आणू नये, तसेच प्रशासनाला सहकार्य करावे.

तत्पूर्वी त्यांनी दीक्षाभूमी परिसरात परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या सदस्यांसह प्रशासनातील जेष्ठ अधिकाऱ्यासोबत शुक्रवारच्या आयोजनासंदर्भात बैठक घेतली. या बैठकीला विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे वर्मा, जिल्हाधिकारी विमला आर, पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सहपालिस आयुक्त अस्वती दोरजे, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज कुमार सूर्यवंशी, अपर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, दीक्षाभूमी स्मारक समितीचे सचिव डॉ. सुधीर फुलझेले, ट्रस्टी विलास गजघाटे, नामदेव सुके, यांच्यासह विविध विभागाचे विभाग प्रमुख व पोलीस अधिकारी सहभागी होते.

दीक्षाभूमीवर येणारी जनता ही अतिशय श्रद्धेने याठिकाणी येते. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करतांना द्विस्तरीय पद्धतीने तपासणी आणि चौकशीचे काम महानगरपालिका व पोलीस विभागाने समन्वयाने करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. शांत डोक्याने करायचे हे एक टीम वर्क असून सामान्य नागरिकांना कोणतीच अडचण जाणार नाही, तसेच त्यांच्या आरोग्यालाही धोका पोहोचणार नाही याची काळजी घेण्याची सूचना त्यांनी यावेळी केली .कोविड तपासणी, लसीकरण तसेच दोन डोस घेतलेल्यांची तपासणीबद्दल प्रशासनातील वरिष्ठांचे मत जाणून घेतले. दीक्षाभूमी, कामठी येथील ड्रॅगन पॅलेस व कोराडी येथील देवीच्या मंदिरातील सामान्य नागरिकांच्या सोई-सुविधा बाबतची माहिती त्यांनी यावेळी घेतली. तीनही ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे. दर दोन-तीन तासांनी आढावा घ्यावा, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या.

त्यानंतर माध्यमांशी बोलताना कोरोना काळात यावर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिन न घेण्याचे प्रशासनाने जाहीर केले आहे. शासकीय नियमानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. गर्दी टाळणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे. त्यामुळे शक्यतो घरीच महामानवाला अभिवादन करण्यात यावे. दीक्षाभूमीवर येताना दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र तसेच कोणते तरी ओळख पत्र जवळ बाळगावे, असे आवाहन त्यांनी केले.

दरम्यान, प्रशासनाने कोरोना अधिक असणाऱ्या जिल्ह्यातील नागरिकांनी या ठिकाणी न येण्याचे आवाहन केले आहे. दीक्षाभूमीवर उद्या फक्त दोन- डोस घेतलेल्यांनाच तपासणीअंती प्रवेश दिला जाणार आहे. 65 वर्षावरील ज्येष्ठांना तसेच दहा वर्षाखालील बालकांना दीक्षाभूमी परिसरात प्रवेश दिला जाणार नाही. आजारी व्यक्ती, गरोदर महिलांनी न येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दीक्षाभूमी परिसरात मुक्काम करता येणार नाही. खाद्यान्न वाटप स्टॉल, मोफत अन्नदान प्रतिबंधित करण्यात आले आहे, या शिवाय या परिसरात पुस्तक,मूर्त्यांचे स्टॉल, लावले जाणार नाही. लक्षणे असणाऱ्यांची तपासणी केली जाणार असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेने कोरोना तपासणी तसेच, कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र लावले आहेत. येणाऱ्या प्रत्येक नागरिकांची तपासणी करण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या आहे. आज दीक्षाभूमी परिसरात लसीकरण केंद्रावर हजारो नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. नागरिकांनीदेखील शिस्तीत दीक्षाभूमीला भेट दिली.