व्यवस्था चालवणाऱ्याच्या मनात भेदभाव नसेल तर खरा उद्देश सफल होतो – सरसंघचालक मोहन भागवत


नागपूर : नागपूरात दसऱ्याच्या निमित्ताने आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात बोलताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी चांगल्या वाईट घटना देशात घडत असतात, त्यावर प्रतिक्रिया देताना प्रत्येकाने समाज तोडणारी नव्हे तर समाज जोडणारी भाषा करायला हवी. प्रत्येकाने मनात असलेली भेदभावाची भावना बदलली पाहिजे. व्यवस्था चालवणाऱ्याच्या मनात भेदभाव नसेल तर खरा उद्देश सफल होतो, असे प्रतिपादन केले आहे.

सरसंघचालक पुढे म्हणाले की, त्याग आणि बलिदानामुळे देशाला स्वातंत्र्य मिळालं. इतिहासात केलेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळली पाहिजे. देशात अनेक गोष्टींवरुन भेदभाव केला जात आहे. देशातील दोन राज्यांमध्ये गोळीबार केला जात आहे. त्यामुळे कुठेतरी हरवत चाललेली अखंडता परत मिळवण्यासाठी आणि परत त्या दुश्मनीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून मुलांनी इतिहास वाचला पाहिजे.

पुढे सरसंघचालक म्हणाले की, मुलांकडे कोरोनाकाळात मोबाईल आला. पण त्याचा वापर कशासाठी केला जात आहे, हे कोणीही पाहत नाही. देशातील तरुण ड्रग्जला बळी पडतात. त्यांच्यामध्ये व्यसनाधीनता वाढत आहे, नवीन तंत्रज्ञानाचा अयोग्य वापर केला जात असल्यामुळे त्यावर नियंत्रण आणायला हवे. स्वत:च्या भाषेचा जास्तीत जास्त वापर केला पाहिजे. स्वभाषा, स्वभूषा आणि इतरही गोष्टींचे जाणिवपूर्वक वापर केला पाहिजे. ‘स्व’चा विसर पडता कामा नये, असेही सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.

सरसंघचालक म्हणाले की, देशाच्या सीमावर्ती जिल्ह्यातील मुस्लिम लोकसंख्या वाढणे आणि तेथील मुस्लिम जनसंख्येची सरासरी ही देशाच्या सरासरीपेक्षा खूप जास्त आहे. हे बांगलादेशमधून घुसखोरी होत असल्याचे दर्शवते. आपल्या देशात पुन्हा एकदा लोकसंख्या धोरणाचा पुनर्विचार व्हावा.