भाजप नेत्यांकडून वारंवार राज्य सरकार पडणार असल्याच्या वक्तव्यावरुन पंकजा मुंडे यांचा पक्षाला घरचा आहेर


सावरगाव – भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्या पक्षातील नेत्यांकडून वारंवार राज्य सरकार पडणार असल्याच्या वक्तव्यावरुन पक्षाला घरचा आहेर दिला आहे. सरकार पडणार की नाही पडणार यातून बाहेर पडा, असे आवाहन करताना त्यांनी सत्ताधाऱ्यांवरही निशाणा साधला आहे. पंकजा मुंडे दसऱ्यानिमित्त भगवान गडावर आयोजित मेळाव्यात बोलत होत्या.

माझ्या पक्षाच्या लोकांनाही मी सांगणार आहे. प्रत्येक नेता उठतो आणि हे सरकार पडणार आहे असे सांगतो आणि प्रत्येक सत्ताधारी आमचे सरकार खंबीर आहे सांगतो. पण तुम्ही सरकार पडणार आणि नाही पडणार यातून बाहेर पडणार आहात की नाही? विरोधी पक्ष रोज मुहूर्त देत आहे, सरकार पडणे आणि सरकार खंबीर असणे आपले ध्येय नाही, तर जनतेसाठी काय करतात ते सांगा. राजकारणातील गुन्हेगारीकरण संपुष्टात आणताना विरोधी पक्षनेता म्हणून गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रात रान उठवले होते, तेव्हा सत्तापरिवर्तन झाले होते. त्यामुळे विरोधी पक्षाने आणि सत्ताधारी आपापल्या भूमिकेकडे आणि जनतेच्या भल्याकडे लक्ष दिले पाहिजे, असे आवाहन पंकजा मुंडे यांनी केले.