राजनाथ सिंह यांनी युद्धकाळात देशाचे नेतृत्व करणाऱ्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींचे केले कौतुक


नवी दिल्ली – सशस्त्र दलांमध्ये महिलांच्या भूमिकेवर शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन सेमिनारमधील भाषणात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केवळ अनेक वर्षे देशाचे नेतृत्वच केले नाही, तर १९७१ मध्ये पाकिस्तानशी झालेल्या युद्धाच्या काळातही त्यांनी महत्वाची भूमिका बजावली, अशा शब्दात इंदिरा गांधींचे कौतुक केले. त्याचबरोबर सिंह यांनी राणी लक्ष्मीबाई आणि माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचेही कौतुक केले आणि भारताला राष्ट्रीय विकासात महिला शक्तीचा वापर करण्याचा सकारात्मक अनुभव असल्याचे म्हणाले.

देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी केवळ अनेक वर्षे देशाचे नेतृत्व केले नाही, युद्धाच्या काळातही त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. भारताने इंदिरा गांधींच्या पंतप्रधानपदाच्या काळात पाकिस्तानविरुद्ध १९७१ चे युद्ध जिंकले आणि त्यामुळे बांगलादेशचा जन्म झाला, असे त्यांनी म्हटले. तर प्रतिभा पाटील भारताच्या राष्ट्रपती होत्या, तसेच त्या भारतीय सशस्त्र दलाच्या सर्वोच्च कमांडर देखील होत्या, असे सिंह म्हणाले.

महिलांच्या सशस्त्र दलांमध्ये सहभागाच्या दृष्टीने सुरुवातीला पुढाकार घेतलेल्या काही देशांपैकी भारत एक आहे आणि आता कमिशनसाठी महिलांना कायमस्वरूपी स्वीकारले जात आहे. येत्या काळात महिला लष्करी तुकड्या आणि बटालियनचे नेतृत्व करताना दिसतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. १०० वर्षांपासून अभिमानाने भारतीय सैन्य नर्सिंग सेवेमध्ये महिला सेवा देत आहेत. १९९२ मध्ये भारतीय लष्कराने महिला अधिकाऱ्यांना कमिशन देण्यास सुरुवात केली होती. आता लष्कराच्या बहुतेक शाखांमध्ये महिला अधिकाऱ्यांना सामावून घेतले जात असल्याचे ते म्हणाले. नौदलात महिलांच्या भूमिकेचा उल्लेख करून सिंह म्हणाले की, एअर ट्रॅफिक कंट्रोलमध्ये १९९३ मध्ये पासून महिलांच्या सहभागाला सुरुवात झाली. तसेच २०१६ मध्ये महिला अधिकारी सागरी विमानाच्या वैमानिक म्हणून पदवीधर झाल्या होत्या आणि आता त्यांना गेल्या वर्षापासून युद्धनौकावर नियुक्त केले जात आहे.