पुणे पोलिसांकडून क्रूज ड्रग्ज प्रकरणात साक्षीदार असलेल्या किरण गोसावी विरोधात लुकआउट नोटीस जारी


पुणे – क्रुज ड्रग्ज पार्टी प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आल्यानंतर पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते व राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी गंभीर आरोप केले. किरण गोसावी व भाजप पदाधिकारी मनीष भानुशाली हे दोघे आर्यन खान व अरबाज मर्चंट यांच्या अटकेच्या वेळी उपस्थित होते. त्यानंतर भाजप पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रीय अमली पदार्थविरोधी पथकाशी (एनसीबी) संबंध काय आहे? असा सवाल केला जात आहे. ही कारवाई बनावट असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला होता.

एनसीबीला किरण गोसावी आणि मनिष भानुशाली यांच्याबद्दल प्रश्न विचारण्या येऊ लागल्यानंतर त्यावर भाष्य केले होते. एनसीबीने आर्यन खान ड्रग्जच्या प्रकरणामध्ये किरण गोसावी याला साक्षीदार बनवले आहे. पण एनसीबीचा साक्षीदार असणाऱ्या किरण गोसावीने अनेक तरुणांची फसवणूक करून त्यांना परदेशात कामाला लावतो, असे सांगून लाखो रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघड झाला आहे. त्यानंतर आता क्रूज ड्रग्ज जप्ती प्रकरणात एनसीबीचा स्वतंत्र साक्षीदार असलेल्या किरण गोसावी यांच्याविरोधात पुणे पोलिसांनी लुकआउट नोटीस जारी केली आहे, अशी माहिती एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने बुधवारी दिली. लुकआउट नोटीशीनुसार एखाद्या व्यक्तीला देश सोडण्यास मनाई केली जाते.

यासंदर्भातील माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे. आम्ही २०१८ मध्ये फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीच्या प्रकरणात फरार असलेल्या किरण गोसावी विरोधात लुकआउट सर्क्युलर नोटीस जारी केल्याचे गुप्ता म्हणाले. पुण्यातील फरासखाना पोलीस ठाण्यात २०१८ मध्ये किरण गोसावीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी पुण्यातील एका तरुणाने तक्रार दिली होती. आपल्या फेसबुक पेजवर गोसावी याने मलेशियात हॉटेलमध्ये नोकरीची संधी अशी पोस्ट टाकली होती. चिन्मय देशमुख या तरुणाने त्याला प्रतिसाद दिला होता. त्यांच्याकडून तीन लाख रुपये घेऊन गोसावीने मलेशियाला पाठविले. पण, तेथे नोकरी न मिळाल्यामुळे तो भारतात परत आला. त्यानंतर त्याने फरासखाना पोलिसांकडे तक्रार दिली होती. या गुन्ह्यात गोसावी फरार असल्यामुळे आता फरासखाना पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.