जावई समीर खान याच्यावर एनसीबीकडून करण्यात आलेल्या कारवाईसंबंधी नवाब मलिक यांचा गौप्यस्फोट


मुंबई : देशातील एनसीबी ही एवढी मोठी तपास संस्था आहे, त्यांच्याकडे अनेक अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरात आहे. तरीही तंबाखू आणि गांजा यातील फरक त्यांना करता आला नसल्याचा आरोप राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे. लोकांना बदनाम करण्याचे काम एनसीबीकडून सुरु असल्याचा आरोपही त्यांनी केला.

नवाब मलिक म्हणाले की, 8 जानेवारी रोजी एका व्हॉट्सअॅपवरुन मुंबईतील काही माध्यमांना एक मेसेज करण्यात आला होता. त्यामध्ये आधीच आपण एक रेड करुन ड्रग्ज संदर्भात कारवाई करत असल्याचे सांगण्यात आले होते. विशेष म्हणजे समीर वानखेडे यांचे नाव या माहितीच्या खाली होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली. कानपूरला छापा मारण्यात आला आणि त्याची माहिती एनसीबीच्या माध्यमातून देण्यात आली.

पुढे नवाब मलिक म्हणाले की, आपले जावई, समीर खान यांना 12 जानेवारीला रात्री 10 वाजता ईडीचे समन्स आले आणि त्यांना ईडीच्या कार्यालयात 13 तारखेला सकाळी 10 वाजता बोलवण्यात आले. माध्यमांना याची माहिती देखील आधीच देण्यात आली होती. त्याच नंबरवरुन तसा मेसेज करण्यात आला होता. त्यामध्ये समीर खान हे ड्रग्ज रॅकेट चालवत असल्याची माहिती पसरवली जात होती. या बनावट प्रकरणात आपल्या जावयाला अटक करण्यात आले.

आपल्या जावयाला या बनावट प्रकरणात आठ महिने तुरुंगात रहावे लागले, तर मुलीला धक्का सहन करावा लागला, असा आरोपही नवाब मलिक यांनी केला. तंबाखू आणि गांजामध्ये एनसीबीला फरक करता आला नाही. 200 किलो गांजा आपल्या जावयाकडे नव्हताच, ते हर्बल तंबाखू असल्याचे स्पष्ट झाले असल्याचेही ते म्हणाले.

दरम्यान, गेल्या काही दिवसात सातत्याने नवाब मलिकांनी एनसीबीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला असून त्यामागे भाजपचा हात असल्याचा आरोप केला होता. त्यांना फोनवरुन या प्रकरणी जीवे मारण्याची धमकी मिळाली असून त्यांच्या सुरक्षेत आता वाढ करण्यात आली आहे.