क्रिप्टोकरन्सी गुंतवणुकीत भारतीय आघाडीवर


भारतात क्रिप्टोकरन्सी म्हणजे आभासी चलनात गुंतवणुकीची जबरदस्त क्रेझ दिसून आली आहे. बिटकॉइन सह अनेक प्रकारच्या क्रिप्टोकरन्सी मध्ये भारतीय मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत असल्याचे ब्रोकर्सचुझर्सच्या रिपोर्ट मध्ये म्हटले गेले आहे. क्रिप्टोकरन्सी गुंतवणुकीत भारतीय जगात आघाडीवर असून अशी गुंतवणूक करणाऱ्या भारतीयांची संख्या १०.०७ कोटी आहे. अमेरिकेत हीच संख्या २.७४ कोटी, रशियात १.७४ कोटी, नायजेरियात १.३० कोटी आहे. विशेष म्हणजे क्रिप्टोकरन्सी संदर्भात भारत सरकार नियंत्रण विधेयक आणण्याची तयारी करत असतानाही भारतीय मोठ्या प्रमाणावर क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणूक करताना दिसत आहेत.

भारतात स्टॉक गुंतवणूकदारांची संख्या जून २०२१ मध्ये ७० दशलक्षावरुन ८० दशलक्ष म्हणजे ८ कोटींवर गेली असून लोकसंखेच्या दृष्टीने विचार केला तर भारतात क्रिप्टोकरन्सी मंध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाण ७.३० टक्के आहे. त्या दृष्टीने भारत जगात पाचव्या स्थानी आहे आणि युक्रेन १२.७३ टक्के आकडेवारीने एक नंबरवर आहे. गेल्या दोन वर्षात भारतात क्रिप्टोकरन्सी गुंतवणुकीत जबरदस्त वाढ झाले असल्याचे रिपोर्ट सांगतो.

जागतिक क्रिप्टोकरन्सी बाजाराचे एकूण मूल्य २ ट्रीलीयन डॉलर्स आहे आणि बाजारात आजघडीला ११००० प्रकारच्या क्रिप्टोकरन्सीचे ट्रेडिंग होत आहे. या करन्सीवर सरकारचे नियंत्रण नसते आणि त्यांच्या मूल्यात मोठ्या प्रमाणावर चढउतार होतात. मार्च २०२० मध्ये भारतीय रिझर्व्ह बँकेने देशात क्रिप्टोकरन्सीवर प्रतिबंध आणला होता मात्र सर्वोच्च न्यायालयाने तो रद्दबातल ठरविला आहे. त्यामुळे आता केंद्र सरकार या बंदीसाठी कायदा करण्याच्या विचारात असून त्यासंदर्भातले विधेयक लवकरच सादर केले जाणार आहे असे समजते.