‘महानिर्मिती’ला हरित ऊर्जा निर्मितीकरिता प्रतिष्ठेचा ‘इंडिया ग्रीन एनर्जी’ पुरस्कार


मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या ऊर्जा विभागाअंतर्गत कार्यरत महानिर्मितीची प्रतिष्ठेच्या इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जी संस्थेतर्फे सन 2021 करिता इंडिया ग्रीन एनर्जी पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महानिर्मितीचे अभिनंदन केले आहे. पर्यावरणपूरक हरित ऊर्जा निर्मितीकरिता हा पुरस्कार देण्यात येतो. मुख्यमंत्री कृषी वाहिनी योजनेअंतर्गत उभारण्यात आलेले व नियोजित सौर ऊर्जा प्रकल्पांकरिता हा पुरस्कार महानिर्मितीला देण्यात आला आहे.

पर्यावरण रक्षण आणि शेतकऱ्यांना दिवसाही ऊर्जा मिळवून देण्यासाठी आम्ही हरित ऊर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. या पुरस्काराने आमच्या प्रयत्नांची राष्ट्रीय पातळीवर दखल घेतली गेली. यामुळे हा पुरस्कार या प्रयत्नांना नवे बळ देणारा आहे, असे डॉ. राऊत म्हणाले.

हा पुरस्कार 20 ऑक्टोबर 2021 रोजी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचे हस्ते दिल्ली येथे प्रदान करण्यात येणार आहे. महानिर्मितीने मुख्यमंत्री कृषी वाहिनी योजनेअंतर्गत आदर्श ग्राम राळेगणसिद्धी येथे 2 मेगावॅट तसेच यवतमाळ जिल्ह्यामध्ये मांजरडा येथे 2 मेगावॅट आणि अमरावती जिल्हा येथील गव्हाणकुंड येथे 16 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पांची उभारणी करून त्या-त्या भागातील शेतकऱ्यांना दिवसा खात्रीशीर वीज पुरवठा होण्यासाठी वरील प्रकल्पांची उभारणी केली आहे.

राज्याच्या वीजेच्या एकूण मागणीमध्ये शेतीकरिता विजेचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो. यामध्ये मागणी आणि पुरवठा पाहता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना रात्रीचा वीज पुरवठा करण्यात येत असल्याने त्यांना अनेक संकटाना सामोरे जावे लागते. तसेच वीजनिर्मिती केंद्रापासून शेतीकरिता वीज वापराचे ठिकाणापर्यंत वीज वहनामध्ये सरासरी 10% तूट होत असते. मात्र या योजने अंतर्गत छोटे सौर ऊर्जा प्रकल्प हे विजेच्या मागणीच्या ठिकाणाजवळ उभारण्यात येत असल्याने वीज वहनातील तूट कमी होण्यास मदत मिळणार आहे. तसेच औष्णिक वीज निर्मिती ऐवजी सौर ऊर्जा प्रकल्पातून ही वीज निर्मिती केल्यास कोळश्यापासून होणारे प्रदूषण कमी होण्यास मदत मिळणार आहे.

पर्यावरणपूरक हरित वीज निर्मितीचे महानिर्मितीद्वारे शेतकऱ्यांना वाजवी दरामध्ये खात्रीशीर दिवसा वीज पुरवठा करता यावा याकरिता महानिर्मितीतर्फे कोणताही फायदा न घेता वीज खरेदी करार करण्यात येत असून महानिर्मिती एकूण 583 मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणी करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून यापैकी टप्पा 1 अंतर्गत राज्यातील विविध 46 ठिकाणी 184 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पांची उभारणी सुरु असून ते मे 2022 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. तसेच उर्वरित प्रकल्प टप्प्याटप्प्याने नजीकच्या काळात कार्यान्वित करण्यात येणार आहेत.