मुंबई – राज्यातील शेतकरी ओल्या दुष्काळामुळे संकटात सापडलेला असून शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत सरकारने मदत दिलेली नाही आणि जर दिवाळी पूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा झाली नाही, तर सर्व शेतकऱ्यांसह मातोश्रीवर जाऊ असा इशारा अमरावतीमधील बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दिला आहे. शेतकऱ्यांना मदत करण्याची सद्बुद्धी मुख्यमंत्री ठाकरे यांना देवो यासाठी आपण अंबादेवीकडे साकडे घातले असल्याचे राणा यांनी सांगितले.
…तर उद्धव ठाकरेंनाही दिवाळी साजरी करु देणार नाही – रवी राणा
जर शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेली, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची दिवाळी सुद्धा अंधारात घालवू, असेही रवी राणा म्हणाले आहेत. यंदा शेतकऱ्याला निसर्गाने साथ दिलेली नाही. शेती-पिके वाहून गेली, घरे वाहून गेली आहेत. शेतकऱ्यावर कर्जाचे ओझे आहे. अमरावतीमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करत आहेत. सध्या शेतकऱ्याची दिवाळी अंधारात जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अशा परिस्थितीत या प्रकरणामध्ये लक्ष दिले पाहिजे. दिवाळीच्या आठ दिवसआधी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे मिळाले पाहिजे. शेतकऱ्याला दिवाळी साजरी करता आली पाहिजे. अन्यथा मातोश्रीवरही दिवाळी साजरी होऊ देणार नाही, असे राणा म्हणाले आहेत.
कितीही पोलीस बंदोबस्त मुख्यमंत्र्यांनी व राज्याच्या पोलीस महासंचालकांनी केला, तरीही शेतकरी मातोश्रीवर पोहोचतील असा विश्वास देखील यावेळी रवी राणा यांनी व्यक्त केला. कितीही अटक केली, ताब्यात घेतले हुकूमशाही केली, तरी शेतकरी मातोश्रीवर जाणार आणि उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर दिवाळी होऊ देणार नसल्याचे राणा यांनी म्हटले आहे.
पत्रकारांनी यावेळी तुम्ही शेतकऱ्यांसोबत जाणार का असा प्रश्न विचारला असता राणा यांनी मागील वेळेस घडलेला घटनाक्रम सांगितला, मी जाणार की नाही हे सांगणार नाही. पण जेव्हा मागच्या वेळेस सांगितले, तेव्हा संपूर्ण फौजफाटा लावून गंगा सावित्री निवासामध्ये आम्हाला नजरकैदेत ठेवले होते. त्यामुळे मी स्वत: काय करणार हे बोलणार नाही. पण राज्यातील शेतकरी मातोश्रीवर जाऊन नक्की बोलणार, असे राणा म्हणाले.