नवी दिल्ली – अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री नोरा फतेहीला नोटीस बजावली असून त्यात दिल्ली येथील ईडीच्या कार्यालयात आज चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना नोराला करण्यात आली आहे. आता बॉलिवूड सेलिब्रिटीही सुकेश चंद्रशेखर मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीच्या रडारवर आल्याचे चित्र दिसत आहे. ईडीने अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसनंतर आता नोरा फतेहीला नोटीस बजावली आहे. नोरा आज दिल्लीतील ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर झाली आहे.
मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अभिनेत्री नोरा फतेही ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर
दिल्लीच्या ईडी कार्यालयात अभिनेत्री नोरा फतेही पोहचली असून नोराला चौकशीसाठी तिहारमधील सुकेश रंजन प्रकरणात बोलवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. याच प्रकरणात उद्या अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसलाही चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. ईडी याच प्रकरणी नोराची चौकशी करणार आहे. ईडीकडून यापूर्वी चौकशीसाठी जॅकलीन फर्नांडिसला बोलवण्यात आले होते. दरम्यान असे सांगण्यात येत आहे की, जॅकलीनलाही सुकेश रंजनकडून फसवण्याचा प्रयत्न करण्यात आल्यामुळेच तिला देखील चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते.
नोराची आज चौकशी केली जात असतानाच याव्यतिरिक्त जॅकलीन फर्नांडिसलाही चौकशीसाठी समन्स पाठवण्यात आले आहे. उद्या जॅकलीन फर्नांडिसला चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. नोरा आणि जॅकलीनची पीएमएलए अॅक्ट अंतर्गत चौकशी करण्यात येणार आहे.